(मुंबई)
राज्यात विविध क्षेत्रांत घोटाळ्यांच्या बातम्या समोर येत असताना आता एक नवा आणि धक्कादायक असा पोस्टाच्या तिकिटांचा घोटाळा उघड झाला आहे. कुरिअरच्या युगात पोस्टाच्या सेवा वापरात घट झाली असली तरी, बनावट पोस्ट तिकिटांच्या या रॅकेटने पोलिसांना मोठा धक्का दिला आहे. या प्रकरणात मुंबईतून एक आणि बिहारमधून दोन, अशा तिघांना अटक करण्यात आली असून त्यांना 23 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्राथमिक तपासात या घोटाळ्याची रक्कम ८ कोटी रुपये असल्याचे उघड झाले असून चौकशीत हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
घोटाळ्याचा उलगडा असा झाला
सप्टेंबर महिन्यात मुंबईच्या मुख्य पोस्टमास्टर जनरल (PMG) यांना भोपाळ टपाल विभागाकडून एक गोपनीय पत्र प्राप्त झाले. या पत्रात मुंबईहून पाठवलेल्या पाच टपाल लिफाफ्यांवरील तिकिटे संशयास्पद असल्याचे नमूद केले होते. त्यानंतर ही तिकिटे तपासणीसाठी इंडिया सिक्युरिटी प्रेस, नाशिक येथे पाठवण्यात आली. अहवालात या तिकिटे बनावट असल्याचे स्पष्ट झाले. ही पत्रे एका वित्तीय कंपनीकडून पाठवली गेल्याने पोस्ट विभागाने चौकशी केली असता, त्यांनी हे काम दुसऱ्या फर्मला आउटसोर्स केल्याचे सांगितले. त्या फर्मने तिकिटे मिळवण्याची जबाबदारी मुंबईतील सायन कोळीवाड्यात राहणाऱ्या राकेश रामधनी बिंद या फ्रँचायझीकडे सोपवली होती. राकेश बिंदला फेब्रुवारी 2024 मध्ये इंडिया पोस्टने फ्रँचायझी मंजूर केली होती. या फ्रँचायझीद्वारे एका वित्तीय कंपनीने 10 जून रोजी 4,986 आणि 13 जून रोजी 6,995 पत्रे पाठवली होती. या सर्व लिफाफ्यांवरील तिकिटे बनावट असल्याचे उघडकीस आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही टोळी अत्यंत हुबेहूब बनावट पोस्टाची तिकिटे तयार करत असे आणि ती मूळ किमतीच्या अर्ध्या दरात बाजारात विकत असे. डाक विभागाने काही लिफाफ्यांवर चिकटवलेल्या तिकिटांची तपासणी केली असता हा बनावटगिरीचा प्रकार उघडकीस आला.हे रॅकेट दीर्घकाळापासून सक्रिय होते आणि त्याचे जाळे अनेक राज्यांमध्ये पसरलेले आहे.
पोलिसांचा तपास आणि अटक
मुंबई जीपीओतील टपाल निरीक्षक आशुतोष कुमार यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली. एमआरए मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. दक्षिण विभागाचे अतिरिक्त आयुक्त अभिनव देशमुख आणि झोन 1 चे डीसीपी प्रवीण मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले. तपासादरम्यान राकेश बिंदला प्रथम अटक करण्यात आली. चौकशीत त्याने बिहारमधील शमसुद्दीन गफ्फार अहमद आणि शाहिद रझा या दोघांची नावे सांगितली. मुंबई पोलिसांच्या पथकाने बिहारमधील समस्तीपूर येथे छापा टाकून 16 ऑक्टोबर रोजी दोघांना ताब्यात घेतले.
बँक खात्यांतून उघड झाला ८ कोटींचा व्यवहार
मुंबई पोलिसांच्या तपासात दोन्ही बिहार आरोपींच्या पाच बँक खात्यांमधून तब्बल ८ कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या आरोपींनी बनावट तिकिटे अर्ध्या किमतीत विकून ती देशभरातील फ्रँचायझीधारकांना आणि एजन्सींना कुरिअर केल्याचे आढळले आहे. या रॅकेटने अनेक राज्यांत बनावट तिकिटांचा पुरवठा केल्याचा संशय असून, टपाल विभागातील काही अधिकारी किंवा कर्मचारी यात सहभागी आहेत का, याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. बनावट तिकिटांच्या छपाईसाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर झाला, तसेच या तिकिटांचे खरेदीदार कोण आहेत, याचा तपास पोलीस डाक विभाग आणि सायबर टीमच्या मदतीने करत आहेत. पोलीस या संपूर्ण रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.

