(पुणे)
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारूकांडातील मृतांचा आकडा आज (शनिवारी) संध्याकाळपर्यंत २२ वर पोहोचला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, केवळ ६,६०० रुपयांच्या अतिरिक्त नफ्यासाठी मुख्य आरोपी योगेश वानखेडे याने मिथेनॉल मिसळून जीवघेणी दारू तयार केल्याचे तपासात उघड झाले आहे. या घटनेमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली असून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी २२ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
तपासानुसार, उरळी कांचन परिसरात राधेश्याम प्रजापती हा हातभट्टीची दारू तयार करत होता. त्याच्याकडून दारू खरेदी करून योगेश वानखेडे विविध ठिकाणी पुरवठा करत असे. अधिक नफा कमावण्याच्या उद्देशाने वानखेडेने २३ मे रोजी प्रथमच मिथेनॉलचा वापर केल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानखेडेने १७,५०० रुपयांना २१० लिटर मिथेनॉल आणि ९,५०० रुपयांना गावठी दारूचे पाच ड्रम खरेदी केले. त्यामध्ये पाणी आणि मिथेनॉल मिसळून त्याने एकूण १२ ड्रम तयार केले आणि हा साठा ३३,६०० रुपयांना विकला. यातून त्याला अवघा ६,६०० रुपयांचा नफा झाला, मात्र या हव्यासामुळे अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
ही विषारी दारू पिंपरीतील फुगेवाडी, खडकी, वडारवाडी, हडपसर आणि काळेपडळ परिसरात विकली गेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दारूमध्ये मिथेनॉलसह नवसागर, युरिया आणि इतर घातक रसायनांचे प्रमाण जास्त असल्याने ती विषारी बनली होती.
दारू सेवन केल्यानंतर मळमळ, उलट्या, दृष्टी धूसर होणे, तोंडाला फेस येणे अशी गंभीर लक्षणे दिसून आली. काही तासांतच यकृत आणि मूत्रपिंड निकामी झाल्याने अनेकांचा मृत्यू झाला. उरळी कांचनमधील ३२ वर्षीय रिक्षाचालक उमेश अवचर याचाही अशाच प्रकारे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेनंतर प्रशासनाने मोठी कारवाई हाती घेतली असून राज्य उत्पादन शुल्क विभागाने हडपसर, दापोडी आणि गोखलेनगर परिसरातून एकूण ६४५ लिटर विषारी दारू जप्त केली आहे. या कारवाईमुळे आणखी मोठा अनर्थ टळल्याचे उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणात कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत उत्पादन शुल्क विभागातील १३ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील ९ अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही निलंबित करण्यात आले आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश वानखेडे याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर यापूर्वीही तीन गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. सध्या पाच जण अतिदक्षता विभागात उपचार घेत असून मृत्यूशी झुंज देत आहेत. पोलिसांनी आतापर्यंत ५० हून अधिक जणांना ताब्यात घेतले असून ५५ ठिकाणी छापेमारी केली आहे. या संपूर्ण रॅकेटचा तपास युद्धपातळीवर सुरू आहे.

