(अकोला)
अकोल्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका बँक अधिकाऱ्याला चॅटिंगच्या माध्यमातून जाळ्यात ओढून, त्याच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. विशेष म्हणजे, या प्रकरणातील दोन्ही आरोपी अल्पवयीन आहेत. पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून, घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
अकोल्यातील एका बँकेत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याची एका मोबाईल अॅपद्वारे दोन अल्पवयीन तरुणांशी ओळख झाली. चॅटिंगच्या माध्यमातून मैत्री वाढत गेली आणि काही दिवसांनंतर दोघांनी अधिकाऱ्याला हिंगणा रोडवरील मोर्णा नदीच्या काठावर भेटण्यासाठी बोलावले. तेथे त्यांच्यात अनैसर्गिक शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. यावेळी आरोपींनी अधिकाऱ्याला उत्तेजक इंजेक्शन दिले आणि स्वतःलाही तेच इंजेक्शन घेतले. या घटनेदरम्यान आरोपींनी गुपचूप अश्लील व्हिडीओ चित्रीत केला. यानंतर या व्हिडीओचा वापर करून त्यांनी बँक अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करत ८० हजार रुपये उकळले. अखेर त्रस्त होऊन बँक अधिकाऱ्याने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोघांनाही ताब्यात घेतले.
सध्या सोशल मीडिया आणि विविध मोबाईल अॅप्सच्या माध्यमातून फसवणुकीच्या घटना वाढत चालल्या आहेत. त्यामुळे कोणताही संशयास्पद अॅप डाऊनलोड करू नये, तसेच अनोळखी व्यक्तींशी चॅटिंग किंवा पैशांची देवाणघेवाण टाळावी, असे आवाहन खदान पोलिस ठाण्याचे ठाणेदार मनोज केदारे यांनी केले आहे.