(ठाणे)
मुदतपूर्व बदलीला आव्हान देण्यासाठी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात (मॅट) बनावट कागदपत्रे सादर केल्याच्या आरोपावरून ठाणे शहरातील पोलिस अमलदार विवेक जाधव यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही माहिती नौपाडा पोलिस ठाण्यातून रविवारी देण्यात आली.
कर्तव्यात कसुरी केल्यामुळे विवेक जाधव यांची १८ सप्टेंबर रोजी नौपाडा पोलिस ठाण्यातून ठाणे शहर पोलिस मुख्यालयात मुदतपूर्व बदली करण्यात आली होती. बदलीचा आदेश आल्यानंतर त्यांना पोलिस ठाण्यातून कार्यमुक्त करण्यात आले. मात्र, या बदलीविरोधात त्यांनी मॅटमध्ये दावा दाखल केला. या दाव्यासोबत त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांपैकी काही बनावट असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन यांच्या पडताळणीत समोर आले.
जाधव यांनी मॅटमध्ये सादर केलेल्या दस्तऐवजांमध्ये, त्यांनी ६ ऑगस्ट रोजी आपल्या आजारपणासंबंधी वैद्यकीय कागदपत्रे पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी आणि अंमलदारांकडे सादर केली असल्याचे दाखवणारे पत्र जोडले होते. त्या पत्रावर नौपाडा पोलिस ठाण्याचा शिक्का आणि अंमलदाराची सही असल्याचे नमूद केले होते. मात्र, या कागदपत्रांची पडताळणी केल्यावर ते शिक्के आणि सही बनावट असल्याचे उघड झाले.
५ ऑक्टोबर रोजी वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता, अशी कागदपत्रे प्राप्त झाल्याचे नाकारले. त्यानंतर तपासात उघड झाले की, विवेक जाधव यांनीच स्वतःच बनावट सही आणि शिक्का वापरून हे दस्तऐवज तयार केले होते. त्यामुळे न्यायाधिकरणाची दिशाभूल करून खोटी माहिती सादर केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध १० ऑक्टोबर रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

