(चिपळूण / प्रतिनिधी)
चिपळूण महाविकास आघाडीत काँग्रेसला नगराध्यक्ष पद देण्यात यावे, अन्यथा काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत आघाडीत जाणार नाही आणि स्वबळावर निवडणूक लढवेल, अशी ठाम भूमिका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष लियाकत शहा यांनी घेतली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे चिपळूण महाविकास आघाडीत चांगलीच खळबळ उडाली आहे.
नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना, आरक्षण आणि नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. यामध्ये काँग्रेसने सर्वप्रथम आपली अधिकृत भूमिका जाहीर केली आहे. मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत लियाकत शहा यांनी ही भूमिका स्पष्टपणे मांडली.
ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट झाले आहेत. शिवसेनेतदेखील दोन गट पडल्यानं त्यांची ताकद विभागली आहे. परंतु काँग्रेस आजही एकसंघ असून तिची ताकद सातत्याने वाढत आहे. चिपळूण शहरात काँग्रेसचा मजबूत जनाधार असून सुमारे पाच हजार हक्काची मते आमच्याकडे आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष पद आमचा हक्क आहे आणि ते काँग्रेसलाच मिळाले पाहिजे.
शहा पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी बरोबर आम्ही आघाडी करण्यास तयार आहोत, पण ती केवळ नगराध्यक्ष पद काँग्रेसला दिल्यासच. अन्यथा काँग्रेस स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरेल. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे चिपळूणच्या राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता निर्माण झाली असून महाविकास आघाडीत आता मिठाचा खडा पडल्याचे स्पष्ट दिसत आहे.

