(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे गावचा सुपुत्र आणि मालगुंड येथील मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेज आणि बळीराम परकर विद्यालयाचा इयत्ता सहावी अ तील विद्यार्थी संगम सुयोग चव्हाण याची तायक्वांदो स्पर्धेसाठी राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. संगम ची राष्ट्रीय स्तरावर झालेली ही निवड संपूर्ण गणपतीपुळे गावासाठी एक ऐतिहासिक क्षण आणि सर्वोच्च सन्मानाची अभिमानास्पद बाब ठरली आहे.
या अनुषंगाने संगम चव्हाण चा विशेष सत्कार गणपतीपुळे येथील ओमसाई शांती ग्रुप तर्फे शुक्रवारी रात्रीच्या सत्रात करण्यात आला. यावेळी ओम साई शांती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विनायक सावंत आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीने संगम ला रोख पारितोषिक व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येऊन त्याला राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. संगम ने छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून नागालँड कोहिमा येथे दिनांक २७ व २८ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघासाठी आपले प्रतिनिधित्व सिद्ध केले आहे.
“मूर्ती लहान, पण कीर्ती महान” या उक्तीप्रमाणे संगमने दैदीप्यमान यश संपादन करून संपूर्ण गणपतीपुळे गावाचे नाव राष्ट्रीय स्तरावर चमकवले आहे. तसेच आपल्या विद्यालयाचे नाव देखील त्याने रोशन करून मालगुंड एज्युकेशन सोसायटीसाठी ऐतिहासिक क्षण संपादन केला आहे. या त्याच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन ओम शांती ग्रुपचे त्याचा विशेष सन्मान करून त्याला राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेसाठी आणि त्याच्या यशस्वी उज्ज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

