(रत्नागिरी / प्रतिनिधी)
भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांच्या दिशेने न्यायालयीन कामकाजादरम्यान वकील राकेश किशोर तिवारी यांनी बूट फेकून हल्ल्याचा प्रयत्न केल्याच्या निंदनीय घटनेविरोधात रत्नागिरीत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या घटनेचा निषेध करण्यासाठी विविध सामाजिक व राजकीय संघटनांच्या समन्वय कृती समितीच्या वतीने आज (दि. १७ ऑक्टोबर २०२५) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चाचे नेतृत्व समितीचे पदाधिकारी आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी यांनी केले. मोर्चादरम्यान “संविधानाचा अपमान असह्य आहे”, “न्यायव्यवस्थेवर हल्ला म्हणजे लोकशाहीवर हल्ला” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. मोर्चाच्या शेवटी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना निवेदन सादर करण्यात आले. दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयातील न्यायदान कक्ष क्र. १ मध्ये ‘खजुराहो विष्णू भग्नमूर्ती’ प्रकरणावर सुनावणी सुरू असताना सकाळी ११ ते ११.३० या वेळेत वकील राकेश किशोर तिवारी यांनी सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न केला. या घटनेने केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या प्रतिष्ठेचा नव्हे, तर भारतीय संविधान आणि लोकशाही मूल्यांचा घोर अपमान झाल्याचे निवेदनात म्हटले आहे.
समितीने सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरचा हल्ला हा व्यक्तीगत नसून, भारतीय संविधान, संसदीय लोकशाही आणि देशाच्या सार्वभौमत्वावरचा अप्रत्यक्ष प्रहार आहे. ही घटना संविधानाच्या उद्देशिकेतील “समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय” या मूलभूत तत्त्वांचा अवमान करणारी असल्याचे नमूद करण्यात आले. संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विरोध करणारी आणि जातीय, धर्माध विचारसरणीचे दर्शन घडवणारी ही घटना असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
या मोर्चातील प्रमुख मागण्यांमध्ये वकील राकेश किशोर तिवारी यांच्यावर संविधान द्रोह, राष्ट्रद्रोह व देशद्रोहाचे गुन्हे तत्काळ दाखल करावेत. अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये संबंधित गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी. घटनेत केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारने दाखविलेल्या निष्काळजीपणाबाबत जाब विचारावा. या घटनेच्या सर्व बाजूंनी सखोल चौकशी करून हल्ल्यामागील कुटील कारस्थानाचा शोध घेण्यासाठी विशेष तपास यंत्रणा स्थापन करण्यात यावी. भविष्यात अशाप्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी कायमस्वरूपी संविधान रक्षण यंत्रणा उभारण्यात यावी. हा हल्ला न्यायसंस्थेवरील विश्वासाला धक्का देणारा असून, भारताची जागतिक प्रतिमा मलिन करणारा आहे. सरन्यायाधीशांवरील हल्ला हा संपूर्ण भारतीय जनतेवरील हल्ला असल्याने दोषीवर तातडीने कठोरात कठोर कारवाई होणे आवश्यक आहे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या मोर्चादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष एल वी पवार (दि. सोसायटी ऑफ इंडिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया), जिल्हाध्यक्ष अनंत सावंत (भारतीय बौद्ध महासभा), बी के पालकर (भारतीय पक्षकार संघटना), जिल्हाध्यक्ष श्रीमती गीता शंकर राठोड (राष्ट्रीय बंजारा मिशन ), दीपक राऊत (भारतीय काँग्रेस ), शहराध्यक्ष प्रशांत साळुंखे (शिवसेना UBT ), अशोक भाटकर (बहुजन क्रांती ऐक्य परिषद ), तालुकाध्यक्ष राजीव कीर (भंडारी समाजिक कार्यकर्ते ), सचिन भाताडे (युनिटी ऑफ मूलनिवासी समाज ), अनिकेत पवार (बहुजन समाज पार्टी), रघुवीर शेलार (तेली माज संघटना), प्रकाश साळवी (रत्नागिरी तालुका कुंभार समाज संघटना), प्रकाश पवार अध्यक्ष (पावस विभाग अध्यक्ष, बौद्ध विकास संघ), प्रदीप पवार ( भीम आर्मी ), तालुकाध्यक्ष राजेंद्र कांबळे ( वंचित बहुजन आघाडी ), रामचंद्र गराटे (कुणबी समाज उन्नती संघ ), आप्पा राठोड (तालुकाध्यक्ष बंजारा बहुउद्देशीय सेवा संघ ) आदी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, वकील, युवक संघटना व विविध पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

