( रत्नागिरी/प्रतिनिधी )
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला हादरा देणारी कारवाई करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन मदार यांना ४ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासांत सापळा रचून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला गर्भवती असून त्यांना गर्भपात करावयाचा होता. त्यासाठी त्यांनी बुधवारी (३ जून) कामथे उपजिल्हा रुग्णालयात जाऊन डॉ. कांचन मदार यांची भेट घेतली होती. यावेळी गर्भपातासाठी आवश्यक असलेले किट (औषधांच्या गोळ्या) उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. मदार यांनी ४ ते ५ हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार संबंधित महिलेने एसीबीकडे केली. तक्रारीची तत्काळ पडताळणी करण्यात आली असता, डॉ. मदार यांनी ४ हजार ५०० रुपये स्वीकारण्यास संमती दर्शवल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीच्या पथकाने तातडीने सापळा रचला. बुधवारी सायंकाळी सुमारे ७ ते ७.३० वाजण्याच्या दरम्यान तक्रारदार महिलेकडून ४ हजार ५०० रुपयांची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी डॉ. मदार यांना पंचांसमक्ष ताब्यात घेतले.
विशेष म्हणजे, ही रक्कम रुग्णालय परिसरात नव्हे तर डॉ. मदार यांच्या खासगी चारचाकी वाहनात स्वीकारण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे सरकारी आरोग्य सेवेच्या चौकटीत सुरू असलेल्या कथित आर्थिक व्यवहारांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. तक्रार दाखल झालेल्याच दिवशी पडताळणी आणि सापळा कारवाई पूर्ण करण्यात आल्याने ही अलीकडील काळातील जिल्ह्यातील सर्वात वेगवान आणि धडक कारवाईंपैकी एक मानली जात आहे. सरकारी सेवांमध्ये नागरिकांकडून आर्थिक अपेक्षा ठेवणाऱ्या प्रवृत्तींविरोधात एसीबीने कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून अधोरेखित झाले आहे.
या प्रकरणानंतर डॉ. मदार यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, या व्यवहारामागे आणखी कोणी सहभागी आहे का, तसेच यापूर्वी अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या का, याचाही तपास सुरू आहे. ही सापळा कारवाई अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुहास रोकडे, मच्छिद्र जाधव, सपोफौ/उदय चांदणे, पोलीस हवालदार संजय वाघाटे, विशाल नलावडे, दिपक आंबेकर, श्रेया विचारे, पोलीस शिपाई हेमंत पवार, राजेश गावकर, महिला पोलीस शिपाई समिता क्षिरसागर, चालक पोलीस शिपाई प्रशांत कांबळे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली आहे.
२०१५ मधील आरोपांची पुन्हा चर्चा
दरम्यान, डॉ. कांचन मदार यांचे नाव यापूर्वीही वादाच्या केंद्रस्थानी आले होते. सन २०१५ मध्ये चिपळूण पंचायत समितीच्या बैठकीत प्रसूतीसाठी येणाऱ्या महिला रुग्णांकडून दोन ते चार हजार रुपयांची अवैध वसुली केली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्या आरोपांमुळे आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली होती. प्रकरण इतके गाजले होते की, त्यावेळी निलंबनाच्या कारवाईपर्यंत विषय पोहोचल्याची चर्चा होती. आता एसीबीच्या ताज्या कारवाईनंतर जुन्या आरोपांची पुन्हा उजळणी सुरू झाली असून, आरोग्य व्यवस्थेतील पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि रुग्णांच्या हक्कांच्या संरक्षणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

