( रत्नागिरी )
सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी जाणीव फाउंडेशन, रत्नागिरी (रजि.) आणि जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढी विभागाच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी, ७ मार्च २०२६ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढी विभागात पार पडणार आहे.
अपघातग्रस्त रुग्ण, शस्त्रक्रिया, प्रसूती तसेच विविध आजारांमुळे रक्ताची गरज भासणाऱ्या रुग्णांसाठी सुरक्षित रक्तसाठा उपलब्ध राहावा, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. “तुमचे एक रक्तदान अनेकांचे जीवन वाचवू शकते” हा संदेश देत आयोजकांनी नागरिकांना या जीवनयज्ञात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
जिल्ह्यातील पहिली ब्लड डोनर डिरेक्टरी जाणीव ने 2012 यावर्षी प्रकाशित केली त्याचा हजारो रुग्णांना लाभ मिळाला म्हणून त्यानंतर प्रत्येक तालुक्यातील रक्तदात्यांची सूची बनवण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू केले आहे
रक्तदान हे सर्वात मोठे सामाजिक दान मानले जाते. निरोगी व योग्य वयाच्या नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. रक्तदानामुळे कोणत्याही प्रकारची शारीरिक हानी होत नाही, उलट नियमित आरोग्य तपासणीची संधी मिळते, असेही स्पष्ट करण्यात आले. या शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी अधिक माहितीसाठी ९४२२००३१२८ किंवा ९०७५२४६४५८ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
“चला रक्तदान करूया, जीवनदान देऊया!” या संदेशासह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिर यशस्वी करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

