(चिपळूण / प्रतिनिधी)
चिपळूण तालुक्यात बुधवारी दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. या दरम्यान मुर्तवडे (बौद्धवाडी) येथे शेतात काम करत असताना वीज कोसळून सुशील शिवराम पवार (वय ४१) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले. या दुर्दैवी घटनेने मुर्तवडे गाव तसेच परिसरात शोककळा पसरली आहे.
गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी दुपारनंतर अचानक जोरदार अवकाळी हजेरी लावली. त्याचवेळी सुशील पवार आणि अन्य ग्रामस्थ शेतात कामात मग्न होते. अचानक वीज कोसळल्याने सुशील पवार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्याचवेळी जवळच असलेले उत्तम भिवा पवार (६५), संतोष विठ्ठल कांबळे (५५), संदीप लक्ष्मण पवार (५२), सुलोचना कांबळे (६५), सुजाता रामदास पवार (३५) आणि रोशन रामदास पवार (१९) हे गंभीर जखमी झाले.
जखमींना तातडीने डेरवण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर सर्वांना रात्री उशिरा घरी सोडण्यात आले. या दुर्घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात असून पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, तालुक्यातील विविध भागांत वादळी वाऱ्यासह पावसाने उग्र स्वरूप धारण केल्याने शेतकऱ्यांचेही नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून या घटनेचा पंचनामा करून पुढील मदतीसाठी प्रयत्न सुरू आहेत.

