(मुंबई)
राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) प्रवाशांच्या सोयीसाठी सुरु केलेल्या ‘आवडेल तिथे प्रवास’ योजनेत आता मोठा दिलासा मिळाला आहे. या योजनेअंतर्गत 4 आणि 7 दिवसांच्या पासचे तिकीट दर कमी करण्यात आले असून, सणासुदीच्या काळात राज्यभर प्रवास आता अधिक किफायतशीर होणार आहे. विशेष म्हणजे, या योजनेत आता साध्या एसटी, शिवशाही तसेच इलेक्ट्रिक बस यांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे प्रवाशांना वातानुकुलित, पर्यावरणपूरक आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल.
ही सुधारित योजना 7 ऑक्टोबरपासून प्रभावी आहे. यामध्ये दोन प्रकारचे पास उपलब्ध आहेत – 4 दिवसांचा आणि 7 दिवसांचा, जे मध्यरात्री 12 वाजल्यापासून पुढील चौथ्या किंवा सातव्या दिवशी रात्री 11.59 पर्यंत वैध राहतात. प्रवाशांना हे पास राज्यातील कोणत्याही एसटी बसस्थानकावर ओळखपत्र दाखवून खरेदी करता येतात. नंतर पास आणि ओळखपत्र दाखवून त्याच कालावधीत राज्यभर कुठेही प्रवास करता येतो. 4 आणि 7 दिवसांचे पास घेऊन प्रवास करणं आता अधिक सोयीचं, आरामदायी आणि परवडणारे ठरणार आहे. या सवलतीमुळे नियमित प्रवाशांबरोबरच सणासुदीच्या काळात प्रवासाचे नियोजन करणाऱ्यांनाही मोठा फायदा होणार आहे.
सुधारित पास दर:
चार दिवसांसाठी:
साधी / जलद बस: जुने दर – ₹1814 / ₹910 → नवे दर – ₹1364 / ₹685
शिवशाही बस: जुने दर – ₹2533 / ₹1269 → नवे दर – ₹1818 / ₹911
इलेक्ट्रिक बस: जुने दर – ₹2861 / ₹1433 → नवे दर – ₹2072 / ₹1038
सात दिवसांसाठी:
साधी / जलद बस: जुने दर – ₹3171 / ₹1518 → नवे दर – ₹2382 / ₹1194
शिवशाही बस: जुने दर – ₹4429 / ₹2217 → नवे दर – ₹3175 / ₹1590
इलेक्ट्रिक बस: जुने दर – ₹5003 / ₹2504 → नवे दर – ₹3619 / ₹1812
एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे प्रवास आर्थिकदृष्ट्या सोपा आणि अधिक आरामदायी झाला असून, राज्यातील सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

