(तरवळ / अमित जाधव)
छत्रपती संभाजीनगर येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनियर कॉलेज मालगुंड मधील संगम सुयोग चव्हाण या विद्यार्थ्याने राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे. व त्याची निवड २७ व २८ ऑक्टोबर रोजी कोहिमा नागालँड येथे होणार राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात झाली आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद छत्रपती संभाजी नगर यांच्या संयुक्त विद्यमाने १३ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर दरम्यान १४,१७, व १९ वर्षे वयोगट यांच्या राज्यस्तरीत शालेय तायक्वांदो स्पर्धा विभागीय क्रीडा संकुल छत्रपती संभाजी नगर बॅडमंटन हॉल येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.
या स्पर्धेसाठी राज्यभरातून छत्रपती संभाजीनगर, अमरावती, पुणे, कोल्हापूर, नाशिक, मुंबई, नागपूर, लातूर, अशा ८ विभागातून सुमारे ४५० खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेज मालगुंड चा खेळाडू संगम सुयोग चव्हाण याने १४ वर्षे वयोगटामध्ये मालगुंड शाळेच्या वतीने कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व केले. यामध्ये अतिशय उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत सुवर्ण पदक पटकावून महाराष्ट्र संघामध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. त्याला प्रशिक्षक क्रीडा शिक्षक रुपेश तावडे, संजय थोरात यांचे महत्वाचे मार्गदर्शन लागले आहे.
संगम सुयोग चव्हाण याने राष्ट्रीय पातळीवर जे उल्लेखनीय यश मिळविले आहे ते खरोखरच संपूर्ण मालगुंड तसेच गणपतीपुळे आणि संपूर्ण तालुका व जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. एक ग्रामीण भागातील विद्यार्थी कोणत्याही प्रकारची पार्श्वभूमी नसताना मेहनत आणि जिद्द व प्रशिक्षक रूपेश तावडे यांच्या उत्तम नेतृत्वाखाली राष्ट्रीय स्तरावर मालगुंड आणि गणपतीपुळे गावचे नाव उज्जल करीत आहे ही अतिशय अभिमानाची बाब आहे. मालगुंड आणि गणपतीपुळे तसेच परिसरासाठी भूषणावह आहे. मालगुंड शाळेच्या इतिहासातील ही एक महत्त्वाची व सर्वात मोठी घटना आहे.
संगम चव्हाण याने राष्ट्रीय पातळीवर मिळविलेल्या दैदिप्यमान यशाबद्दल मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सुनील उर्फ बंधू मयेकर, उपाध्यक्ष विवेक परकर, सचिव विनायक राऊत, खजिनदार संदीप कदम, संचालक रोहित मयेकर, किशोर पाटील, मेहंदळे गुरुजी, परेश हळदणकर, मुख्याध्यापक बिपिन परकर, पर्यवेक्षक उमेश केळकर शिक्षक शिक्षकेतर, कर्मचारी यांनी तसेच जिल्हा संघटना अध्यक्ष व्यंकटेशराव कररा, विश्वदास लोखंडे, शशांक घडशी, लक्ष्मण कररा, राम कररा, राज देवरुखकर, किशोर गुरव सुरज पवार आदींनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
संगम सुयोग चव्हाण याने जे यश संपादन केले आहे त्यासाठी त्याचे संपूर्ण मालगुंड तसेच गणपतीपुळे परिसरातून कौतुक केले जात आहे. त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

