(रत्नागिरी)
आज दिनांक २० ऑगस्ट २०२५ रोजी प्रस्तावित वाटद एमआयडीसी विरोधी संघर्ष समिती तसेच स्थानिक भूमिपुत्र यांची स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांसहित भेट घेऊन या MIDC संदर्भातील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी समिती प्रमुख श्री प्रथमेश गावणकर तसेच समितीचे प्रमुख पदाधिकारी यांच्याशी सखोल चर्चा करण्यात आली. यातून खालील प्रश्नावर साधक बाधक चर्चा करून प्रशासकीय यंत्रणेने तसेच पालकमंत्री महोदयांनी स्थानिक भूमिपुत्रांच्या या उपस्थित केलेल्या प्रश्नांचे निराकरण करावे अन्यथा वाटद एमआयडीसी प्रस्ताव रद्द करावा अशी आमची मागणी आहे. येणाऱ्या काळात संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली तर येथील स्थानिक भूमिपुत्रांच्या पाठीशी मनसे असेल याची ग्वाही मनसे तालुका अध्यक्ष श्री रुपेश जाधव यांनी यावेळी उपस्थिताना दिली.
या बैठकीला मनसे रत्नागिरी तालुका अध्यक्ष श्री रुपेश जाधव, एमआयडीसी विरोधी संघर्ष कृती समिती प्रमुख – श्री प्रथमेश गोपाळ गावणकर अध्यक्ष श्री सहदेव वीर, उपाध्यक्ष श्री संतोष बारगुडे ,कार्यकारणी सदस्य – प्रदीप वीर,सुरेश घवाळी, दिनेश धनावडे,दिलीप वीर, ओंकार शितप, मनसे तालुका उपाध्यक्ष श्री राजू पाचकुडे, सुधीर जाधव, श्री. सागर मयेकर, सोमनाथ पिलणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सदरहू बैठकीत खालील मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली असून याचे निराकरण प्रशासनाने करावे अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.
१) प्रस्तावित वाटद एमआयडीसी भू संपादन प्रक्रिया ही संशयास्पद असून त्यात पारदर्शकता नाही. अनेक परप्रांतीय गुंतवणकदार लोकांनी स्थानिकांकडून या जमिनी अलीकडील काळात स्थानिक ग्रामस्थांकडून खरेदी केल्या आहेत.
२) या वाटद, खंडाळा , जयगड पंचक्रोशीतील परिसरात गेली अनेक वर्षे अनेक मोठे उद्योग समूह कार्यरत परंतु स्थानिक भूमिपुत्र अजूनही रोजगाराच्या प्रतीक्षेत आहे त्याचे निराकरण उद्योग मंत्र्यांनी, पर्यायाने प्रशासनाने केले पाहिजे.
३) प्रस्तावित MIDC मध्ये केवळ 300 एकर जमिनीत एका मोठ्या उद्योगपतींचा शस्त्र, दारुगोळा निर्मिती कारखाना अपेक्षित असताना २२०० एकर जमिनीचे भू संपादन कोणासाठी व कशासाठी ??
४) मनसेची भूमिका ही स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे, नवनवीन उद्योग येथे आले पाहिजेत तसेच या उद्योगात स्थानिक भूमिपुत्रांची भागीदारी असली पाहिजे ही पक्षाचे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे यांच्या भूमिकेला अनुसरूनच हा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील अन्य MIDC मध्ये कार्यान्वित केला गेला पाहिजे.
वरील मागण्यांच्या अनुषंगाने मनसे स्थानिक भूमिपुत्रांच्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभी असून वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाने पुढील भूमिका लवकरच स्पष्ट केली जाईल असे प्रतिपादन मनसे तालुका अध्यक्ष श्री रुपेश जाधव यांनी केले आहे.

