( रत्नागिरी /प्रतिनिधी )
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी नुकतीच जाहीर झालेल्या आरक्षण प्रक्रियेत गव्हाणे जिल्हा परिषद गटाचे आरक्षण बदलल्याने स्थानिक पातळीवर नाराजी व्यक्त होत आहे. या बदलावर मौजे गव्हाणे (ता. लांजा) येथील अनिरुद्ध शिवराम कांबळे यांनी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे औपचारिक आक्षेप नोंदवला आहे.
कांबळे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, २०२२ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या आरक्षण प्रक्रियेत गव्हाणे गटाला अनुसूचित जाती (पुरुष) म्हणून आरक्षण देण्यात आले होते. तथापि, चालू वर्षी १३ ऑक्टोबर २०२५ रोजी पार पडलेल्या नव्या आरक्षण प्रक्रियेत या गटाचे आरक्षण सर्वसाधारण (General) असे निश्चित करण्यात आले आहे. या अचानक झालेल्या बदलावर कांबळे यांनी नाराजी व्यक्त करत त्यावर पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.
याशिवाय, हर्णे, हातखंबा आणि वाटद-खंडाळा या जिल्हा परिषद गटांमध्ये मात्र २०१७ साली जसे आरक्षण होते, तेच आरक्षण यंदाही कायम राहिल्याची नोंद कांबळे यांनी घेतली आहे. “एकीकडे काही गटांचे आरक्षण कायम ठेवले जात असताना, गव्हाणे गटात अचानक बदल करण्यात येत असल्याने या प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव दिसून येतो, असे कांबळे यांनी त्यांच्या निवेदनात नमूद केले आहे. या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने संबंधित आक्षेपाची दखल घेऊन न्याय निर्णय घेण्याची अपेक्षा स्थानिक नागरिक आणि उमेदवारांमधून व्यक्त होत आहे.

