(सातारा)
कराडजवळील आगाशिवनगर परिसरात सोमवारी मध्यरात्री थरारक घटना घडली. घरात घुसून वाद घालत मारहाण करणाऱ्या प्रियकरावर कुऱ्हाडीचे वर्मी घाव घालून विवाहित प्रेयसीने हत्या केल्याची खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून न्यायालयाने तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मृत राजेंद्र मरीआप्पा काळे (वय-४५ रा. शिवाजी स्टेडियम च्या पाठीमागे कराड), रा. शिवाजी स्टेडियम मागे, कराड, हा गवंडी काम करत होता. आरोपी वंदना (वय ४०), रा. मलकापूर, ता. कराड, ही मजुरी करते. दोघांमध्ये काही काळापासून प्रेमसंबंध होते. दोघेही विवाहित असून वंदनाला दोन विवाहित मुली आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी पतीचे निधन झाल्यामुळे वंदना ही महिला इंगवलेवस्ती, येथे चार वर्षांपासून तीन मुलीसह वास्तव्यास आहे. दोन मुलींचे विवाह झाले आहेत. एका लहान मुलीसह ती सध्या एकटीच राहत होती. सोमवारी मध्यरात्री राजा वंदनाच्या घरात घुसला. त्या वेळी वंदना आणि तिची एक विवाहित मुलगी घरात होती. “तू भेटायला येत नाहीस, बोलत नाहीस, तुझे बाहेर संबंध आहेत” असे आरोप करत त्याने वाद घातला. वाद वाढला आणि रागाच्या भरात वंदनाने घरातील कुऱ्हाडीने राजेंद्रवर वार केले.
मान, गळा आणि चेहऱ्यावर बसलेल्या घावांमुळे राजेंद्र रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. घटनेनंतर वंदनाने डायल 112 वर कॉल करून पोलिसांना माहिती दिली. रात्र गस्तीवरील पोलिस घटनास्थळी पोहोचले असता वंदना हातातच कुऱ्हाड घेऊन बसलेली होती. तिच्या अंगावर रक्ताचे डाग होते.
वंदनाने पोलिसांना सांगितले की, राजेंद्र वारंवार भेटण्यासाठी आणि बोलण्यासाठी त्रास देत होता. संशयातून तो मारहाण करायचा. त्या रात्री घरात घुसून त्याने मला आणि माझ्या मुलीला मारहाण केली. असह्य त्रासामुळे मी त्याच्यावर हल्ला केला. या प्रकरणी वंदना हिला अटक करण्यात आली आहे. मंगळवारी तिला कराड न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. उपनिरीक्षक कृष्णा डिसले पुढील तपास करत आहेत.

