(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी सांबरे मोफत रुग्णालयाच्या बाहेर उभ्या असलेल्या एका साध्या नारळपाण्याच्या स्टॉलमागे माणुसकीचा सुगंध दरवळतोय. रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाइकांना परवडणाऱ्या दरात नारळपाणी उपलब्ध करून देत स्टॉलधारक प्रमोद भास्कर नाखरेकर समाजसेवेचे वेगळे उदाहरण घालून देत आहेत.
रुग्णालयामध्ये दाखल असलेल्या रुग्णांना वैद्यकीय उपचारांसोबतच पौष्टिक आहार आणि द्रवपदार्थांची गरज भासते. याच गरजेतून नाखरेकर यांनी ही सेवा सुरू केली आहे. दररोज साधारण पन्नासहून अधिक नारळांची विक्री या स्टॉलवर होते. मात्र, ही विक्री नुसती व्यावसायिक नाही, तर ती सेवाभावी दृष्टिकोनातून होत असल्याने अनेक रुग्ण आणि त्यांचे नातेवाइक या उपक्रमाचे कौतुक करत आहेत.
रुग्णालयात उपचार घेणारे अनेक रुग्ण आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतात. त्यांना थोड्या दरात नारळपाणी मिळावे, हीच माझी इच्छा आहे, असे नाखरेकर सांगतात. त्यांच्या या छोट्या उपक्रमामुळे रुग्णांना शारीरिक ताजेतवानेपणा आणि मानसिक दिलासा मिळतो, हे विशेष म्हणावे लागत आहे. सांबरे हॉस्पिटलच्या आवारात दररोज उभा राहणारा हा नारळपाण्याचा स्टॉल केवळ तहान भागवण्यासाठी नाही, तर माणुसकीचा शीतल स्पर्श देण्यासाठीही उभा आहे. त्यामुळे ही ‘नारळसेवा’ रत्नागिरीकरांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.
परिसरात पार्किंगचा गंभीर प्रश्न
सांबरे रुग्णालयामध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांसमोर पार्किंगचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. रुग्णालयाच्या आवारात केवळ स्टाफसाठी राखीव पार्किंग व्यवस्था असल्याने सर्वसामान्य नागरिकांना आपली वाहने रुग्णालयाच्या बाहेरच, मुख्य रस्त्यालगत उभी करावी लागतात. दररोज शेकडो नागरिक रुग्णांना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये येत असतात. मात्र, योग्य पार्किंग व्यवस्था नसल्यामुळे परिसरात वाहतूककोंडी निर्माण होते. अनेकदा रस्त्यावर उभ्या केलेल्या गाड्यांमुळे रुग्णवाहिकांना अडथळा निर्माण होतो, तर पादचारी नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.

