(पुणे)
पुण्यामध्ये एका 26 वर्षीय चार्टर्ड अकाउंटंटचा कामाच्या दबावामुळे मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली आहे. मुलीच्या आईने बॉसवर कामाचा दबाव टाकल्याचा आरोप केला आहे. अॅना सेबॅस्टियन पिरायिल नावाची तरुणी मार्च 2024 मध्ये EY पुणे येथे नोकरी लागली होती. त्यानंतर 4 महिन्यांतच तिचा मृत्यू झाला. याबाबत तिच्या आईने कंपनीच्या प्रमुखांना पत्र लिहून आपल्या मुलीला न्याय देण्याची मागणी केली आहे. पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
केरळमधील सीए तरूणी अॅना सेबॅस्टिन पेरायल (Anna Sebastian Perayil) अर्न्स्ट अँड यंग (ईवाय) कंपनीच्या पुणे कार्यालयात काम करत होती. ती २०२३ मध्ये तिची सीए परीक्षा उत्तीर्ण झाली. मार्च २०२४ मध्ये पुण्यात ईवायमध्ये एक्झिक्युटिव्ह म्हणून ती रुजू झाली. ही तिची पहिलीच नोकरी असल्याने, तिने कंपनीच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम केले, पण या प्रयत्नांमुळे तिच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यावर मोठा परिणाम झाला, असं तिच्या आईचं म्हणणं आहे.
पेरायलची आई अनिता ऑगस्टिन यांनी कंपनीचे भारतातील बॉस राजीव मेमाणी यांना एक ईमेल लिहिला आहे. या पत्रात आईने कंपनीला खडे बोल सुनावले आहेत. कंपनीची मानवी हक्क मूल्यं आणि तिच्या मुलीने अनुभवलेली वास्तविकता कशापणे पूर्णपणे परस्पर विरोधी आहेत, यावरही त्यांनी प्रकाशझोत टाकला.
अनेक कर्मचार्यांनी दिला होता राजीनामा
तिच्या आईच्या म्हणण्यानुसार, “कंपनीत रुजू झाल्यानंतर लगेचच तिला अँक्झायटी, निद्रानाश आणि ताणतणाव जाणवू लागला, परंतु कठोर परिश्रम आणि चिकाटी हा यशाचा मार्ग आहे यावर विश्वास ठेवून तिने स्वत:ला पुढे रेटणे सुरु ठेवले.” अॅनाच्या आईने दावा केला की अनेक कर्मचाऱ्यांनी जास्त कामाच्या ओझ्यामुळे राजीनामा दिला, पण आपल्या मुलीच्या बॉसने तिला इथेच राहून टीमबद्दल सर्वांचे मत बदलण्यास सांगितले. माझी मुलगी रात्री उशिरापर्यंत आणि वीकेंडलाही काम करत असे. अॅनाने तिच्यावर असलेल्या कामाच्या प्रचंड ताणाबद्दल सांगितलं होतं. अधिकृतरित्या तिला सोपवलेल्या कामांच्या पलिकडे तोंडी नियुक्त केलेल्या कामांबद्दलही तिने माहिती दिली. मी तिला सांगायचे की अशी कामं करु नकोस, पण तिची मॅनेजर ऐकायची नाही. त्यामुळे तिने रात्री उशिरापर्यंत काम केलंय, अगदी वीकेंडलाही. तिला श्वास घ्यायलाही वेळ नव्हता” असं तिची आई म्हणते.
मृत्यूचं कारण अस्पष्ट
अॅनाच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी, तिच्या मृत्यूच्या काही आठवड्यांपूर्वी छाती आकुंचित झाल्याची तक्रार केली होती, असे ईमेलमध्ये म्हटले आहे. “आम्ही तिला पुण्यातील हॉस्पिटलमध्ये नेले. तिचा ईसीजी नॉर्मल होता. हृदयरोगतज्ज्ञ तिला म्हणाले की, तिला पुरेशी झोप मिळत नव्हती आणि ती वेळेवर जेवत नव्हती. असे सांगून त्यांनी अँटासिड्स लिहून दिली, त्यामुळे आम्हाला खात्री झाली की हे फार गंभीर नाही. मात्र २० जुलै रोजी तिचा मृत्यू झाला.” असं अॅनाच्या आईने सांगितलं. एका तरुण चार्टर्ड अकाउंटंटचा कामाच्या ओझ्यामुळे मृत्यू होणे व तिच्या अंत्यसंस्काराला कंपनीचा एकही व्यक्ती उपस्थित न राहणे ही अत्यंत भयावह व वाईट गोष्ट आहे, असे अनिता यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
केंद्रीय कामगार मंत्रालयाने मुलीच्या आईचे अनिता ऑगस्टीन यांची तक्रार स्वीकारल्याचे म्हटले आहे. अॅनाच्या मृत्यूची चौकशी केली जाईल. कामगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर सांगितले, ‘अॅनाच्या निधनाने दु:ख झाले. असुरक्षित आणि तणावपूर्ण वातावरणाच्या आरोपांची कसून चौकशी केली जात आहे. न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कामगार मंत्रालय आणि मनसुख मांडविया यांनी तक्रार आपल्या हातात घेतली आहे.