(कोल्हापूर)
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, अमोल काळे आणि शरद कळसकर या तिघांना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. याआधी या प्रकरणातील नऊ आरोपींना जामीन मिळाला होता. त्यामुळे आता या गुन्ह्यातील सर्व १२ संशयित आरोपींची सुटका झाली आहे.
या तिघांना आतापर्यंत जामीन मिळालेला नव्हता आणि ते कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात होते. आज (मंगळवार) त्यांच्या जामीन अर्जांवर सर्किट बेंचकडे सुनावणी झाली. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने तिघांनाही जामीन मंजूर केला. यामुळे या हत्येच्या प्रकरणातील सर्वच संशयित आरोपींना न्यायालयीन प्रक्रियेद्वारे सशर्त स्वातंत्र्य मिळाले आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर १६ फेब्रुवारी २०१५ रोजी कोल्हापुरात मॉर्निंग वॉकदरम्यान दोन अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यात पानसरे गंभीर जखमी झाले होते, तर त्यांच्या पत्नी उमा पानसरेही जखमी झाल्या होत्या. उपचारादरम्यान २० फेब्रुवारी रोजी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी ते ८२ वर्षांचे होते.
या प्रकरणाच्या तपासात नंतर गौरी लंकेश हत्या प्रकरणाशी संबंधित काही आरोपींची नावे समोर आली होती. त्यानंतर तपास यंत्रणांनी डॉ. वीरेंद्र तावडे, अमोल काळे, शरद कळसकर यांच्यासह १२ जणांना अटक केली होती. मात्र, अनेक वर्षांच्या सुनावणीनंतर आता सर्व आरोपींना जामीन मंजूर झाल्याने हा गुन्हा पुन्हा चर्चेत आला आहे.

