(मुंबई)
यु-डायस प्लस नोंदणीच्या आकडेवारीतून राज्यातील शाळांमधील चिंताजनक वास्तव समोर आले आहे. शालेय शिक्षण विभाग गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षणासाठी विविध उपक्रम राबवत असताना, ग्रामीण, डोंगराळ आणि दुर्गम भागातील शाळांची परिस्थिती बिकट असल्याचे चित्र दिसून येते.
३० सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या नोंदणीच्या आकडेवारीनुसार, राज्यातील ३९४ शाळांमध्ये एकही विद्यार्थी नोंदलेला नाही. पुण्यात सर्वाधिक ३७ शाळा रिकाम्या आहेत, तर रत्नागिरीत २४, नागपूरमध्ये २३ आणि बुलढाण्यात २१ शाळा शून्य विद्यार्थ्यांसह आहेत.
अधिक चिंताजनक बाब म्हणजे, रत्नागिरी जिल्ह्यातील ७१३ शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या १० च्या खाली आहे. पुण्यात ६२७, रायगडमध्ये ६८२, तर सिंधुदुर्गमध्ये ५६९ शाळांमध्ये विद्यार्थी खूप कमी आहेत.
राज्यात एकूण २,११,८६,९४३ विद्यार्थ्यांची नोंद झाली आहे, जी मागील वर्षाच्या तुलनेत फक्त सुमारे सात हजारांनी जास्त आहे. मात्र, पाच लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंद अजून अपूर्ण आहे. यामुळे काही प्रमाणात विद्यार्थी संख्या वाढेल असे दिसत असले तरी ग्रामीण शाळांमध्ये रिक्ततेचे प्रमाण चिंताजनक राहिले आहे.
मुंबई उपनगरांमध्येही ३५० शाळा अशा आहेत ज्या अत्यल्प विद्यार्थ्यांसह कार्यरत आहेत. मुंबई शहरातील ३४, ठाण्यातील १९९ आणि पालघरमधील १२४ शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या १० च्या खाली आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये १००–३०० शाळांमध्ये अत्यल्प विद्यार्थी नोंदले गेले आहेत. राज्यभर ७,९४६ शाळांमध्ये फक्त १ ते १० विद्यार्थी नोंदले गेले आहेत.

