(पुणे)
राज्यातील आरोग्य विभागात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) कार्यरत असलेल्या सुमारे ३२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबरचे वेतन थकले असून, दिवाळीच्या दोन दिवसांवरही पगार न मिळाल्याने हे कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत.
“लोक दिवाळी साजरी करतील, आम्ही त्यांच्याकडे बघत बसायचे का?” असा संतप्त सवाल हे आरोग्य कर्मचारी करत आहेत. महागाई वाढली, घरखर्च वाढले, हातात काहीच पैसे उरले नाही, अशी सध्या त्यांची स्थिती आहे.
वेतनवाढीचे आश्वासन अपुरेच ठरले
विविध मागण्यांसाठी एनएचएम कर्मचारी गेल्या महिन्यात बेमुदत संपावर गेले होते. त्यानंतर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी त्यांच्या १३ पैकी १० मागण्या तत्त्वतः मान्य करत लेखी आश्वासन दिले होते. मात्र, महिनाभर उलटून गेला तरी कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतन जमा झालेले नाही. “ती १० टक्के वाढ राहू द्या, पण मूळ पगार तरी द्या,” अशी वेळ या कर्मचाऱ्यांवर आली आहे.
दोन ते तीन महिन्यांच्या अंतराने पगार
राज्यभरातील १२ हजार समुदाय आरोग्य अधिकारी आणि २० हजार इतर कर्मचारी आरोग्य विभागातील रिक्त पदे भरून काढत काम करतात. मात्र, त्यांना कधीच नियमित वेतन मिळालेले नाही. दोन-तीन महिन्यांच्या अंतराने मिळणाऱ्या पगारावरच त्यांचे घर चालत आहे.
कर्मचाऱ्यांना कामाच्या स्वरूपानुसार इन्सेंटिव्ह देण्यात येते, परंतु तोही अनेक महिन्यांपासून थकलेला आहे. त्यामुळे “पगार नाही, इन्सेंटिव्ह नाही, दिवाळी कशी साजरी करायची?” असा प्रश्न सर्वांच्याच चेहऱ्यावर उमटत आहे.
अलीकडेच शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना १५ टक्के मानधनवाढ देण्याचा निर्णय घेतला असून राज्यभरातील ५० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. या निर्णयाचे स्वागत होत असले तरी, “वाढीचा निर्णय कागदावर, पगार मात्र अजून खात्यात नाही” अशी कर्मचाऱ्यांची खंत आहे.

