(मुंबई)
वर्गमैत्रिणीची मस्करी करण्यासाठी तिला अयोग्य आणि अश्लील संदेश पाठवल्यामुळे पोक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल केलेल्या मुंबईतील १५ वर्षीय मुलीने आपल्यावरील गुन्हा रद्द करण्यासाठी मे. उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
याचिकाकर्त्या अल्पवयीन मुलीवर तिच्या वर्गमैत्रीणीसह तिच्या आईलाही असे अश्लील स्वरूपाचे संदेश पाठवल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने “वर्गमैत्रीणी दोघीही अल्पवयीन असताना पोलिसांनी गुन्हा कसा दाखल केला?” असा सवाल उपस्थित केला.
घटनेत पीडित १५ वर्षीय मुलीने पोलिसांकडे तक्रार केली होती की, एका अनोळखी क्रमांकावरून तिला ‘मी तुझ्या प्रेमात पडलो आहे’ अशा प्रकारचे अश्लील मेसेज सतत येत होते. त्यानंतर तिने तो क्रमांक ब्लॉक केला, मात्र तिच्या सोशल मीडियावर पुन्हा अशाच प्रकारचे संदेश दिसू लागले.
काही दिवसांनी पीडितेच्या आईलाही अशाच स्वरूपाचे मेसेज येऊ लागले. परिस्थिती त्रासदायक होत चालल्याने आई-मुलगी दोघींनी संबंधित क्रमांक ब्लॉक केला. त्यानंतर त्या व्यक्तीने पीडितेच्या मित्रांसह एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून तिथे लैंगिक स्वरूपाचे संदेश पाठवले.
सततचा पाठलाग आणि अश्लील मजकुरामुळे त्रस्त होऊन कुटुंबाने कांदिवली पोलिसांकडे तक्रार केली. १० जुलै २०२५ रोजी पोक्सो आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस तपासात धक्कादायक गोष्ट उघड झाली की, हे सर्व मेसेज पीडितेच्या शाळेतीलच दुसऱ्या १५ वर्षीय मुलीने पाठवले होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपी मुलीने केवळ मस्करीच्या हेतूने हे संदेश पाठवले होते आणि तिला त्याचे कायदेशीर परिणाम माहित नव्हते.
सध्या आरोपी मुलीने पोक्सोखाली दाखल खटला रद्द करण्याची मागणी करीत मे. उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही याचिका मुख्य न्यायमूर्ती श्री. चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम ए. अंखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणीस आली आहे.

