(मुंबई)
पुण्यातील गुंड घायवळ याला शस्त्र परवाना दिल्याप्रकरणामुळे मंत्री योगेश कदम सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या प्रकरणावरून विरोधकांनी त्यांच्यावर आरोपांचा भडिमार सुरू केला असताना, कदम यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे.
कदम म्हणतात, “२०१९ पासून माझी राजकीय कारकीर्द संपवण्याचा प्रयत्न काहीजण सतत करत आहेत. तरीही सच्च्या शिवसैनिकांच्या जोरावर मी निवडून आलो. सत्तेत आमदार झाल्यानंतर माझ्याकडून जनतेच्या अपेक्षा वाढल्या. पण ज्या विरोधकाला आम्ही पराभूत केलं, त्यालाच काहीजणांनी बळ देण्याचं काम केलं. स्वतःच्या पक्षातील आमदाराला संपवण्याचा प्रयत्न आतूनच सुरू होता.”
ते पुढे म्हणाले, “२०२४ च्या निवडणुकीत माझ्या कुटुंबीयांचा राजकीय फायद्यासाठी वापर करण्यात आला. मला पराभूत करण्यासाठी समाज, पैसा आणि जातीच्या आधारावर गलिच्छ राजकारणाचे डावपेच रचले गेले. माझ्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप करून वैयक्तिक बदनामी करण्याचाही प्रयत्न झाला. तरीही जनतेने माझ्यावर विश्वास ठेवला आणि पुन्हा मला निवडून दिले. वरिष्ठ नेत्यांनीही माझ्यावर विश्वास दाखवून मंत्रिपदाची जबाबदारी दिली. त्यामुळे ज्यांना मला आमदार म्हणून पाहायचे नव्हते, त्यांना मी मंत्री झालो हे कसे सहन होईल?”
कदम यांनी विरोधकांवर नीचपणाचा आरोप करताना म्हटलं, “गेल्या सहा वर्षांत माझ्यावर कधीही गुंड किंवा भ्रष्ट प्रवृत्तीचं समर्थन केल्याचा आरोप सिद्ध झाला नाही. तरीही काही मंडळी माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहेत. इतकंच नव्हे, तर राजकारणात सक्रिय नसलेल्या माझ्या आईलादेखील या वादात ओढून नीचपणाचा कळस गाठला गेला.”
शेवटी कदम म्हणाले, “राजकारणात वादळं उठतातच, पण छोटीमोठी वादळं उठली म्हणून पर्वत हलतो असं नाही. मी आजवर कधीच विचलित झालो नाही आणि यापुढेही होणार नाही. माझं काम, जबाबदारी आणि कर्तव्य मी प्रामाणिकपणे पार पाडत आलो आहे आणि पुढेही तसंच करत राहणार आहे.”

