(मुंबई)
देशप्रेमाचे प्रतीक ठरलेले ‘वंदे मातरम्’ गीत आपल्या १५०व्या वर्षात पदार्पण करत आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचे औचित्य साधून मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आज, शुक्रवार, ७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘वंदे मातरम्’ चे भव्य समूहगान आयोजित करण्यात आले आहे.
या सार्ध शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने पुढील एक वर्षभर कौशल्य विकास विभागाच्या वतीने राज्यभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
१८७५ साली थोर कवी व तत्वज्ञ बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेले ‘वंदे मातरम्’ हे गीत भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणास्थान ठरले. या गीताच्या १५० वर्षपूर्तीनिमित्त मंत्री लोढा यांच्या संकल्पनेतून राज्यभर निबंध लेखन, परिसंवाद, वक्तृत्व स्पर्धा, प्रदर्शने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनेही राज्यभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातील.
मंत्री लोढा म्हणाले, “‘वंदे मातरम्’ हे केवळ गीत नाही, तर देशभक्तीचे स्फूर्तिस्थान आहे. स्वातंत्र्यवीरांना अभिवादन आणि मातृभूमीला वंदन करण्याचा संस्कार यातून रुजतो.”
यासाठी शासकीय तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये समूहगानाचे आयोजन करण्याबाबत शासनस्तरावर परिपत्रक जारी करण्यात आले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनानुसार देशभर या सोहळ्याचे औचित्य साजरे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
राज्यभरातील शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था आणि समाजमाध्यमांच्या माध्यमातून या ऐतिहासिक उत्सवाला व्यापक स्वरूप देण्याचा कौशल्य आणि सांस्कृतिक विभागाचा प्रयत्न आहे. “देशभक्ती जागृत करणाऱ्या या सार्ध शताब्दी महोत्सवात सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा,” असे आवाहन मंत्री लोढा यांनी केले.

