(नवी दिल्ली / जळगाव)
मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना किमान एक वर्ष सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केले आहे. वाढती महागाई, परकीय चलनसाठ्यावर वाढणारा ताण आणि आयात खर्च लक्षात घेऊन करण्यात आलेल्या या आवाहनामुळे देशातील सराफ बाजारात मोठी चर्चा सुरू झाली असून ज्वेलरी उद्योगात चिंता व्यक्त केली जात आहे.
देशातील सर्वात मोठी ज्वेलरी व्यावसायिक संघटना ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल यांनी या आवाहनामुळे सराफ व्यवसायावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. संघटनेचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी सांगितले की, “भारतामध्ये सोने हे केवळ दागिना नाही, तर धार्मिक, सांस्कृतिक आणि आर्थिक सुरक्षिततेचे प्रतीक आहे. देशात दरवर्षी सुमारे 700 टन सोन्याची आयात होते. लोकांनी सोने खरेदी कमी केल्यास जवळपास एक कोटी लोकांच्या रोजगारावर परिणाम होऊ शकतो.” ज्वेलरी उद्योगाचा देशाच्या जीडीपीमध्ये जवळपास 7 टक्के वाटा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विशेषतः महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील कारागिरांना याचा सर्वाधिक फटका बसण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावमध्ये या आवाहनानंतरही महिलांची दागिन्यांच्या खरेदीसाठी गर्दी कायम असल्याचे चित्र दिसून आले. लग्नसराई, सण-उत्सव आणि पारंपरिक गुंतवणूक म्हणून सोन्याला आजही मोठी पसंती मिळत आहे. “हौसेला मोल नसतं” या भावनेतून अनेक महिला खरेदी करत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
जळगाव जिल्हा सराफ असोसिएशनने मात्र पंतप्रधानांच्या भूमिकेला समर्थन दिले आहे. “देशहितासाठीच हे आवाहन करण्यात आले असावे. प्रत्येक नागरिकाने देश प्रथम या भूमिकेतून काही काळ संयम बाळगावा,” असे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
तज्ज्ञांच्या मते, भारत हा जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या आयातदार देशांपैकी एक आहे. वाढत्या कच्च्या तेलाच्या किंमती आणि जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या आयातीमुळे परकीय चलनसाठ्यावर अतिरिक्त दबाव येत आहे. त्यामुळेच सरकारकडून नागरिकांना अनावश्यक खर्च टाळण्याचे आवाहन करण्यात येत असल्याचे आर्थिक तज्ज्ञांचे मत आहे.
पंतप्रधान मोदी यांनी हैदराबादमधील सभेत नागरिकांना इंधन वापर कमी करणे, अनावश्यक परदेश दौरे टाळणे आणि विदेशी चलनाची बचत करण्याचेही आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर सोन्याच्या खरेदीबाबत केलेल्या वक्तव्याने देशभरातील सराफ बाजार, गुंतवणूकदार आणि ग्राहकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे.

