(सांगली)
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील बनावट चलन तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत पोलिसांनी तब्बल एक कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून, त्यातील एक आरोपी शाहूपुरी पोलीस ठाण्यातील हवालदार असल्याचे उघड झाले आहे. या कारवाईबाबतची माहिती सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी शुक्रवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
बनावट नोटा तयार करणे, साठवणे आणि चलनात आणणे या गंभीर प्रकरणी हवालदार इब्रार आदम इनामदार (वय ४४, रा. कसबा बावडा, कोल्हापूर), सुप्रीत काडप्पा देसाई (वय २२, रा. गडहिंग्लज), राहुल राजाराम जाधव (वय ३३, रा. लोकमान्यनगर, कोरोची, ता. हातकणंगले), नरेंद्र जगन्नाथ शिंदे (वय ४०, रा. टाकळा, राजारामपुरी, कोल्हापूर) आणि सिद्धेश जगदीश म्हात्रे (वय ३८, रा. मालाड, मुंबई) या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने सर्व आरोपींना १३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणाचा उलगडा मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने केला. उपअधीक्षक प्रणिल गिल्डा आणि सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने निलजी-बामणी, कोल्हापूर रोड पुलाखाली संशयास्पद हालचाल करणाऱ्या एका व्यक्तीची झडती घेतली. पोलिस उपनिरीक्षक रूपाली गायकवाड, पूनम पाटील, हवालदार सचिन कुंभार, अभिजित पाटील, सर्जेराव पवार, राहुल क्षीरसागर, नानासाहेब चंदनशिवे, बसवराज कुंदगोळ, राजेंद्र हारगे, अमोल तोडकर व विनोद चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.
या कारवाईत सुप्रीत देसाई याच्याकडे पाचशे रुपयांच्या ८४ बनावट नोटा सापडल्या. चौकशीत त्याने त्या नोटा राहुल जाधव याच्याकडून घेतल्याचे सांगितले. दोघांवरून पुढील तपास वाढवला असता रूईकर कॉलनीतील पोलीस कर्मचारी इब्रार इनामदारच्या कार्यालयातच बनावट नोटा तयार होत असल्याचे उघड झाले.
त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून छपाईसाठी वापरली जाणारी उपकरणे, लॅपटॉप, प्रिंटिंग यंत्र आणि नोटा तयार करण्यासाठीचे ठसे जप्त केले. या ठिकाणाहून ₹९८,४३,५०० दर्शनी मूल्याच्या पाचशे रुपयांच्या १९,६८७ बनावट नोटा आणि ₹८५,८०० मूल्याच्या दोनशे रुपयांच्या ४२९ बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या. शिवाय, विनानोंदणीची ₹१० लाखांची इनोव्हा कार देखील पोलिसांनी जप्त केली आहे.
प्राथमिक तपासात उघड झाले आहे की, या टोळीने बनावट नोटा चलनात आणण्याचा हा पहिलाच प्रयत्न केला होता. एकास तीन या प्रमाणात नोटांची देवाणघेवाण केली जात होती. म्हणजेच, एक हजार रुपयांच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात तीन हजार बनावट नोटा देण्याचा सौदा करण्यात आला होता. हा व्यवहार आरोपी सिद्धेश म्हात्रे याच्यामार्फत चालत असल्याचे संशयितांनी कबूल केले आहे.
जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा तयार करून चलनात आणण्याचा प्रकार पोलिसांनी प्रथमच उघडकीस आणला आहे. ही यशस्वी कारवाई करणाऱ्या पथकाला विशेष बक्षीस जाहीर करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगितले.

