(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
ऑनलाइन औषध विक्रीविरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने (AIOCD) पुकारलेल्या देशव्यापी बंदला रत्नागिरी जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील सुमारे साडेसातशे औषध विक्रेत्यांनी बुधवारी (दि. २० मे) बंदमध्ये सहभाग घेतल्याने संपूर्ण जिल्ह्यातील औषध वितरण व्यवस्था ठप्प झाली होती. परिणामी नागरिकांची मोठी गैरसोय झाली असली, तरी “हा लढा केवळ व्यवसायासाठी नव्हे तर देशातील औषध वितरण व्यवस्थेच्या अस्तित्वासाठी आहे,” असा दावा संघटनेकडून करण्यात आला.
देशातील औषध व्यवसाय ‘ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स अॅक्ट १९४०’ आणि ‘रूल १९४५’ अंतर्गत नियंत्रित केला जातो. मात्र या कायद्यात ऑनलाइन औषध विक्रीसंदर्भात कोणतीही स्पष्ट तरतूद नसताना, देशभरात मोठ्या प्रमाणावर ई-फार्मसी कंपन्यांकडून औषध विक्री सुरू असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. केंद्र सरकारने २०१८ मध्ये यासंदर्भात नोटिफिकेशन जारी केले असले, तरी त्याचे अद्याप कायद्यात रूपांतर झालेले नाही. दिल्ली उच्च न्यायालयानेही ऑनलाइन औषध विक्रीला स्थगिती दिलेली असताना सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची टीका संघटनेकडून करण्यात आली.
कोरोनाकाळात घरपोच औषधसेवेसाठी दिलेली तात्पुरती सवलत आजही कायम ठेवण्यात आली असून, त्याचाच आधार घेत कॉर्पोरेट आणि ऑनलाइन कंपन्यांनी औषध व्यवसायात आक्रमक प्रवेश केल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. विशेषतः ग्रामीण भागातील पारंपरिक औषध दुकाने त्यामुळे आर्थिक संकटात सापडत असून, भविष्यात गावागावातील औषध सेवा धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ‘ड्रग प्राईस कंट्रोल ऑर्डर’ (DPCO) २०१३ नुसार किरकोळ विक्रेत्यांचा नफा मर्यादित असताना, ऑनलाइन कंपन्या २० ते ५० टक्क्यांपर्यंत सवलती देत बाजारपेठ ताब्यात घेत असल्याचा आरोपही करण्यात आला. “नियम आम्हाला आणि मोकळीक कॉर्पोरेट कंपन्यांना, ही दुहेरी भूमिका सरकार किती दिवस चालवणार?” असा सवाल औषध विक्रेत्यांकडून उपस्थित करण्यात आला.
औषध विक्रेत्यांना डॉक्टरांनी लिहिलेल्या ब्रँडऐवजी समतुल्य पर्यायी औषध देण्याचा अधिकार द्यावा, तसेच नफ्यावरील निर्बंध शिथिल करावेत, अशा मागण्याही संघटनेकडून करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात केंद्रीय मंत्री, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही वारंवार निवेदने देऊनही कोणताही ठोस प्रतिसाद मिळाला नसल्याची खंत संघटनेने व्यक्त केली. दरम्यान, जिल्ह्यातील बहुतांश औषध दुकाने दिवसभर बंद राहिल्याने नागरिकांची गैरसोय झाली. मात्र “आजचा बंद हा इशारा आहे; अन्यथा भविष्यात पारंपरिक औषध दुकानेच नामशेष होतील,” असा इशारा औषध विक्रेत्यांनी दिला आहे.

