(मुंबई)
राज्यात जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यात होत असलेल्या विलंबामुळे विद्यार्थी आणि पालक त्रस्त झाले आहेत. नियमांनुसार, जात पडताळणीसाठी दाखल केलेले प्रकरण ९० दिवसांत निकाली काढणे अपेक्षित असते. प्रस्तावात त्रुटी असल्यास त्या दूर करून पाच महिन्यांच्या आत अंतिम निर्णय देणे आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्षात तीन-तीन महिने उलटूनही प्रमाणपत्र मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. सध्या राज्यातील जात पडताळणी समित्यांकडे तब्बल ४० हजार प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. या वाढत्या प्रलंबित कामांमुळे संपूर्ण यंत्रणेवर ताण निर्माण झाला असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नियोजन विस्कळीत होत आहे.
दरम्यान, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मे २०२५ मध्ये हस्तक्षेप करून पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावला होता. त्यानंतर राज्यातील सर्व ३६ जात पडताळणी समित्यांना पूर्णवेळ अध्यक्ष नियुक्त करण्यात आले. यापूर्वी जुलै-ऑगस्ट २०२४ दरम्यान ३६ पैकी २३ समित्यांकडे पूर्णवेळ अध्यक्ष नव्हते.
पदोन्नतीनंतर समित्यांना स्वतंत्र अधिकारी मिळाले असले तरी काही अधिकाऱ्यांनी सोयीच्या ठिकाणी बदली घेतल्यामुळे सध्या सात समित्यांचे कामकाज इतर जिल्ह्यांतील अध्यक्षांकडे सोपवावे लागत आहे. त्यामुळे अनेक प्रकरणांचा निपटारा वेळेत होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्रुटींची पूर्तता करूनही प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांना आणि पालकांना वारंवार समिती कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत आहेत. याचा थेट परिणाम प्रवेश प्रक्रियेवर होत आहे. अलीकडेच राज्यातील सर्व जात पडताळणी समित्यांचा आढावा घेण्यात आला असून, प्रलंबित प्रकरणे लवकर निकाली काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शैक्षणिक आणि निवडणूक संबंधित प्रकरणांना प्राधान्य देण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, दहावी-बारावीचे निकाल १५ मेपूर्वी जाहीर होण्याची शक्यता असून, विज्ञान शाखेत प्रवेश घेणाऱ्या तसेच व्यावसायिक शिक्षणासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र अत्यावश्यक आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेपूर्वीच प्रमाणपत्र मिळावे यासाठी तालुकानिहाय विशेष मोहिमा राबवाव्यात, अशी मागणी पालकांकडून जोर धरत आहे.
एकूणच, वाढत्या प्रलंबित प्रकरणांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अडचणीत येऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

