(मुंबई)
दसरा मेळाव्यानंतर पेटलेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आणि माजी मंत्री रामदास कदम तसेच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यातील वाद अद्याप थांबलेला नाही. या वादात आता नवा गौप्यस्फोट झाला आहे. शिवसेना (उबठा) आमदार अनिल परब यांनी योगेश कदम यांनी कुख्यात गुंड निलेश घायवळला शस्त्र परवाना देण्यासाठी शिफारस केल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना रामदास कदम यांनी “विधिमंडळात उच्च पदावर बसलेल्या आणि आमदार- मंत्र्यांना आदेश देणाऱ्या व्यक्तीनंच ही शिफारस केली होती” असा दावा करत खळबळ उडवली आहे.
रामदास कदम म्हणाले, या प्रकरणात योगेश कदम यांना जाणूनबुजून अडकवले जात आहे. निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्यासाठी विधिमंडळातील एका उच्च पदावरील व्यक्तीनं शिफारस केली होती. ती व्यक्ती मोठी आहे, इतकी की तिला ‘न्यायाधीश’ म्हणावं लागेल. त्या व्यक्तीनं सचिन घायवळ हा स्वच्छ चारित्र्याचा असल्याची शिफारस दिली, त्यानुसार योगेश कदम यांनी निर्णय घेतला. अशा व्यक्तीने सांगितल्यानंतर, त्याने शिफारस केल्यानंतर, त्याच्या दृष्टीने ती व्यक्ती स्वच्छ असेल असे वाटून आपण हा निर्णय घेतला, असे रामदास कदम म्हणाले. कदम पुढे म्हणाले की, योगेश यांनी त्या व्यक्तीचं नाव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले आहे.
दरम्यान, अनिल परब यांनी कदम पिता-पुत्रांवर डान्स बारशी संबंधित आरोप केल्यानंतर रामदास कदम यांनीही थेट पलटवार केला. “माझ्या पत्नीच्या नावावर असलेला ‘ड्रमबीट बार’ हा डान्स बार नाही. तो हॉटेल आहे आणि सध्या बंद आहे. उलट ‘ड्रमबीट बार’ कोणाचा आहे हे अनिल परब यांनी सांगावं. तो बार ठाकरे कुटुंबीयांचा आहे,” असा आरोप रामदास कदम यांनी केला.
कदम पुढे म्हणाले, “मागील अडीच वर्षांपासून योगेश कदम यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. योगेश निवडून आल्यापासून काहींच्या पोटात दुखत आहे. मी माझ्या आयुष्यात कधीही काळे धंदे केले नाहीत,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
सचिन घायवळवर एकही गुन्हा नाही – योगेश कदम
सचिन घायवळ यांच्यावर 15-20 वर्षांपूर्वी गुन्हे दाखल होते, परंतु 2019 साली न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. मागील 10 वर्षांत त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन त्यांना शस्त्र परवाना देण्याचा निर्णय घेतला गेला, असे गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले.
राम शिंदे यांच्या पाया पडतानाचा गुंड नीलेश घायवळचा व्हिडीओ व्हायरल
विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या पाया पडतानाचा त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये घायवळ हा राम शिंदे यांना वाकून नमस्कार करताना दिसतो. तसेच विधानसभा निवडणुकीदरम्यान नीलेश घायवळ हा राम शिंदे यांच्या प्रचारसभांमध्ये भाषण करतानाही दिसल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या दोन्ही दृश्यांमुळे गुंड आणि राजकीय व्यक्तींमधील संबंधांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सभापती राम शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. “राजकीय वरदहस्ताशिवाय नीलेश घायवळसारख्या गुंडाला पासपोर्ट आणि व्हिसा मिळणे शक्य नाही. त्यामुळे यामागे कोणाचा आशीर्वाद आहे, हे जनतेसमोर यावे,” अशी मागणी रोहित पवार यांनी केली.

