(पुणे)
पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि पालकांचे डोळे उघडणारी घटना समोर आली आहे. घरात खेळत असताना दोन वर्षांच्या चिमुकल्याने चुकून अॅसिड प्राशन केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर बालकाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत. बालकाला उलट्या होऊ लागल्याने त्याच्या पालकांची धावपळ उडाली. त्याला श्वसनाचा त्रास होऊ लागताच परिसरातील खाजगी रु ग्णालयात दाखल केले.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना घरात स्वच्छतेचे काम सुरू असताना घडली. घरातील साफसफाईसाठी वापरण्यात येणारी अॅसिडची बाटली एका कोपऱ्यात ठेवण्यात आली होती. खेळता खेळता या दोन वर्षांच्या मुलाचे लक्ष त्या बाटलीकडे गेले. बाटलीत पाणी असल्याच्या समजुतीने त्याने टोपण उघडून अॅसिड तोंडात ओतले.
अॅसिड पोटात जाताच चिमुकल्याला तीव्र वेदना होऊ लागल्या आणि तो जोरजोरात रडू लागला. आवाज ऐकून घरातील व्यक्तींनी तातडीने धाव घेतली असता हा गंभीर प्रकार उघडकीस आला. अॅसिडमुळे मुलाच्या तोंडाला व अन्ननलिकेला गंभीर जखमा झाल्या असून त्याला त्वरित जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही घटना घरातील विषारी पदार्थ, अॅसिड, फिनाईल किंवा औषधे लहान मुलांच्या आवाक्यात ठेवल्यास किती मोठा धोका निर्माण होऊ शकतो, याचे गंभीर उदाहरण आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत असून पालकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
कीटनाशके, उंदरांना मारायचे विष, ब्लिचिंग पावडर, सल्फ्युरिक अॅसिड, पॅराफिन (रॉकेल) यांसारखी अत्यंत घातक रसायने घरातील वापरातील भांडी, बाटल्या किंवा पाण्याच्या कंटेनरमध्ये कधीही ठेवू नयेत. अशा विषारी द्रव्यांमुळे विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत गंभीर अपघात होण्याचा धोका असतो.
घरात ठेवलेल्या सर्व विषारी पदार्थांच्या भांड्यांवर स्पष्ट इशारे व धोकादायक खूण (Label) लावणे अत्यंत आवश्यक आहे. ही भांडी नेहमी घट्ट बंद करून, मुलांच्या आवाक्याबाहेर आणि सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. निष्काळजीपणामुळे घडणाऱ्या अशा घटनांमुळे जीविताला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
विषारी द्रव्ये पोटात गेल्यास मेंदूचे गंभीर नुकसान होणे, अंधत्व येणे, शरीराचा अर्धा भाग निकामी होणे किंवा आयुष्यभरासाठी महत्त्वाचे अवयव कायमस्वरूपी जायबंदी होण्याची शक्यता असते. त्यामुळे घरातील प्रत्येकाने विषारी रसायनांच्या साठवणुकीबाबत जागरूक राहणे आणि आवश्यक ती खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

