(मुंबई)
दरवर्षीप्रमाणे यंदाही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा पारंपरिक दसरा मेळावा दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये रंगणार आहे. यंदाच्या मेळाव्याचा टीझर सोमवारी जाहीर करण्यात आला असून, त्यातून राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
काय आहे ठाकरे गटाचा टीझर?
“परंपरा विचारांची, धगधगत्या मशालीची, महाराष्ट्रहितासाठी होणार, गर्जना ठाकरेंची!” असे शब्द या टीझरमध्ये झळकतात. विशेष म्हणजे या व्हिडिओत उद्धव ठाकरे यांचा फोटो किंवा भाषणाचा एकही सीन नाही. त्यामुळे राज ठाकरे यांनाही या मेळाव्याला आमंत्रण मिळणार का, हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.
या टिझरमधील एक वाक्य लक्षवेधी ठरत आहेत. ते म्हणजे “महाराष्ट्रहितासाठी होणार गर्जना ठाकरेंची”. या मेळाव्याच्या टिझरमध्ये उद्धव ठाकरेंचा फोटो नाही फक्त हे वाक्य आहे. “गर्जना ठाकरेंची” म्हणजे उद्धव ठाकरेंची एकट्याची की ठाकरे बंधूंची ही चर्चा आता सुरु झाली आहे.
राज ठाकरे मेळाव्याला येणार ?
काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे नेते सचिन आहिर यांनी “दसरा मेळाव्यासाठी राज ठाकरे यांनाही निमंत्रण दिले जाऊ शकते” असे वक्तव्य केले होते. त्यानंतर आता टीझरमध्ये दाखवलेल्या “गर्जना ठाकरेंची” या ओळींमुळे अटकळांना आणखी उधाण आले आहे. विशेष म्हणजे, ज्या मैदानात हा मेळावा होणार आहे, त्याच्या समोरच राज ठाकरे यांचा ‘कृष्णकुंज’ बंगला आहे. त्यामुळे या मेळाव्याला ते हजेरी लावतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या काही महिन्यांत उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जवळकीची चर्चा आहे. त्यामुळे हा मेळावा ठाकरे बंधूंच्या एकीचा मंच ठरेल का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. आगामी मुंबई महानगरपालिका तसेच राज्यातील 27 महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
मुंबईत नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी जोरदार पाऊस झाला असला तरी “पाऊस असो वा काही असो, मेळावा होणारच,” असा ठाम दावा ठाकरे गटाने केला आहे. लाखोंच्या संख्येने शिवसैनिक आणि शिवप्रेमी जनता हजेरी लावणार असल्याची माहितीही गटाने दिली. या दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरे कोणते राजकीय संदेश देतील आणि राज ठाकरे प्रत्यक्षात उपस्थित राहतील का, याकडे आता महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

