(मुंबई)
राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदार यादी आज जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांना आपल्या नावाची तपासणी करण्यासाठी https://mahasecvoterlist.in/
या संकेतस्थळावर ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ हा या निवडणुकांसाठी अधिसूचित दिनांक निश्चित केला आहे. त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकांसाठी आधार म्हणून वापरली जाणार आहे. याच आधारे जिल्हा परिषदेच्या निवडणूक विभागनिहाय, पंचायत समितीच्या निर्वाचक गणनिहाय, तसेच नगरपरिषद व नगरपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी तयार करण्यात आली आहे.
नागरिकांना आपले नाव शोधण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर — https://mahasec.maharashtra.gov.in/ संबंधित लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रारूप मतदार यादींच्या छायांकित प्रती संबंधित तहसील कार्यालयात, तर नगरपरिषद व नगरपंचायतींच्या यादींच्या छायांकित प्रती त्यांच्या संबंधित कार्यालयांत नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.
मतदार यादीच्या प्रतींसाठी प्रति पृष्ठ दोन रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तसेच, प्रारूप आणि अंतिम मतदार यादींच्या विनाछायाचित्र पीडीएफ प्रत https://mahasecvoterlist.in/ObjectionOnClick/DownloadVoterlist
या संकेतस्थळावरून मोफत डाउनलोड करता येतील. या सुविधेमुळे नागरिकांना नाव तपासणे, दुरुस्त्या व हरकती नोंदवणे सुलभ होणार आहे.
अधिक माहितीसाठी नागरिकांनी जवळच्या तहसील कार्यालय, नगरपरिषद किंवा नगरपंचायत कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.

