(सातारा)
साताऱ्यातील शिवथर (ता. सातारा) येथील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या एटीएमला गॅस कटरने फोडून तब्बल १२ लाख रुपये लंपास करणाऱ्या हरियाणातील आंतरराज्य दरोडेखोर टोळीला मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात पोलिसांनी जेरबंद केले आहे. सातारा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) तब्बल ७०० किलोमीटरचा थरारक पाठलाग करत ही कारवाई केली.
हासमदिन अल्लाबचाए खान (रा. मलार, ता. फलोदी, जि. जोधपूर, राजस्थान), सलीम मुल्ली इस्ताक (रा. दौरखी, ता. फिरोजपूर, जि. नहुमेवात, हरियाणा), राहूल रफिक (रा. बाजीदपूर, ता. फिरोजपूर, जि. नहुमेवात, हरियाणा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या तिन्ही आरोपींना १० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
गुन्ह्याचा उलगडा कसा झाला?
६ डिसेंबरच्या मध्यरात्री SBI एटीएम फोडल्यानंतर आरोपी क्रेटा कारमधून फरार झाले. पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ही कार हरियाणा मेवात टोळीची असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर LCB च्या तीन स्वतंत्र पथकांनी तपास सुरू केला. गुन्ह्यानंतर आरोपी पुणे–औरंगाबाद–धुळे–धार–इंदूर–दिल्ली या मार्गाने हरियाण्याकडे पळत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. आरोपी आणि पोलिसांच्या वाहनांमध्ये सतत २००–२५० किमीचा फरक राहूनही साताऱ्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी मध्यप्रदेशातील धार आणि इंदूर जिल्ह्याच्या पोलिसांशी थेट समन्वय साधून नाकाबंदी लावण्यास सांगितले. पोलिसांनी शेवटी आरोपींना पिथमपूर (जि. धार) हद्दीत अटक केली.
जप्त मालमत्ता व गुन्ह्यांची कबुली
चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी खालील मालमत्ता जप्त केली
- ₹11,99,000 रोख (चोरीतील जवळपास सर्व रक्कम)
- गुन्ह्यात वापरलेली क्रेटा कार
- एटीएम फोडण्यासाठी वापरलेले गॅस कटर इत्यादी साहित्य
अटक आरोपी हे सराईत एटीएम चोर असून गुजरात, आसाम, राजस्थान आणि कर्नाटक येथेही त्यांच्या विरोधात एटीएम चोरीचे गुन्हे नोंद आहेत

