(मुंबई)
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले. यावेळी त्यांनी सविस्तर प्रेझेन्टेशन सादर करत अपघाताच्या वेळापत्रकात, विमानाच्या तांत्रिक स्थितीत आणि कंपनीच्या भूमिकेत अनेक संशयास्पद बाबी असल्याचा दावा केला.
रोहित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई ते बारामतीचे अंतर 210 किमी असून हा प्रवास 27 मिनिटांचा आहे. अपघातग्रस्त विमान VSR कंपनीचे असून विजय कुमार सिंग आणि रोहित सिंग हे कंपनीचे मालक आहेत. विस्ता सेल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत 27 भागधारक असून कंपनीच्या ताफ्यात 7 Learjet 45 विमाने आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अपघाताच्या दिवशीचे मिनिटनिहाय वेळापत्रक
रोहित पवार यांनी अपघाताच्या दिवशी घडलेल्या घटनांचा तपशील मांडला.
- सकाळी 7.02 सर्वजण विमानतळावर पोहोचले
- 7.03 पायलटने बारामतीला फोन करून व्हिजिबिलिटीची चौकशी केली
- 7.10 सर्व काही ठीक असल्याचे सांगण्यात आले
- 7.50 अजित पवार विमानतळावर पोहोचले
- 7.56 विमान ATC च्या संपर्कात आले
- 8.10 टेकऑफ
- 8.22 लोणावळा परिसर
- 8.25 पुण्याजवळ
- 8.30 यवत
- 8.32 सुपे
- 8.43 ते 8.45 दरम्यान अपघात
- 9.00 जखमी असल्याच्या बातम्या
- 9.45 निधनाच्या बातम्या
“घड्याळ पाहून मन सुन्न झालं”
“सोशल मीडियावर अजित पवार परत येतील, ते जिवंत आहेत, अशा पोस्ट फिरत होत्या. पण अपघातस्थळी सापडलेलं त्यांचं घड्याळ आणि जळलेला स्वेटर पाहिल्यावर वास्तव स्वीकारावं लागलं. अजित पवार यांचं घड्याळ नेहमी 15 मिनिटे पुढे असायचं. त्या घड्याळात 9 वाजले होते,” असे भावनिक वर्णन रोहित पवार यांनी केले.
विमान 16 वर्षे जुने; आधीही अपघात
अपघातग्रस्त विमान 16 वर्षे जुने असून अपघाताच्या दोन दिवस आधी ते मुंबई-सुरत-मुंबई असे उड्डाण करून आले होते, अशी माहिती रोहित पवार यांनी विमान ट्रॅकिंग अॅपचे फोटो दाखवत दिली.
VSR कंपनीच्या मालकाने विमान चांगल्या स्थितीत होते, वैमानिक अनुभवी होते आणि अपघात व्हिजिबिलिटीमुळे झाला, असा दावा केला होता. मात्र स्थानिकांच्या प्रत्यक्ष अनुभवांवरून हा दावा खोटा ठरत असून विमानात यांत्रिक बिघाड झाल्याचे स्पष्ट संकेत मिळतात, असा आरोप रोहित पवार यांनी केला.
गंभीर प्रश्न उपस्थित
रोहित पवार यांनी या प्रकरणात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले.
- टेकऑफपूर्वी विमानाची तपासणी झाली होती का?
- तपासणी कोणी केली?
- विमानाचे नियमित मेंटेनन्स झाले होते का?
- 2023 मध्ये VSR कंपनीच्या विमानाचा अपघात होऊनही अहवाल सादर का झाला नाही?
तसेच अपघातग्रस्त विमानात Stall Warning System बंद होती, त्यामुळे धोका आधीच कळू शकला नाही, असे तज्ज्ञांचे मत असल्याचा दावाही त्यांनी केला.
रोहित पवारांनी उपस्थित केलेले 10 महत्त्वाचे सवाल
- दौरा, विमानाची वेळ आणि पायलट बदलण्यामागचे कारण काय?
- केंद्रीय विमान मंत्रालयाच्या अहवालात वेळेतील विसंगती का?
- व्हिजिबिलिटी कमी असताना लँडिंग का?
- विमानाचा आवाज वेगळा का येत होता?
- ट्रान्सपॉन्डर बंद होता का?
- पायलट सुमित कपूरचा वादग्रस्त ट्रॅक रेकॉर्ड दुर्लक्षित का केला?
- पायलटवर दबाव होता का?
- अवघड रनवेची निवड का करण्यात आली?
- अपघाताच्या क्षणी मुख्य पायलट शांत का होता?
- फॉरेन्सिक टीम उशिरा का पोहोचली?
शेवटी, इतर नेते आणि मंत्र्यांच्या सुरक्षिततेसाठी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.

