(मुंबई)
१३ ऑक्टोबरपासून आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारकडून दिलासादायक बातमी आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा सप्टेंबर महिन्याचा पगार वेळेत व्हावा म्हणून सरकारने तब्बल ₹४७१.०५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. या निर्णयामुळे एसटी महामंडळातील ८३ हजार कर्मचाऱ्यांचा सप्टेंबर महिन्याचा पगार वेळेत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
यासोबतच, दिवाळी सणासाठी उत्सव अग्रीम उचल देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.
एसटी महामंडळाने जारी केलेल्या पत्रकानुसार, दिवाळी सण २१ ऑक्टोबर २०२५ दरम्यान साजरा होणार आहे. ज्यांना रु. १२,५००/- इतकी उत्सव अग्रीम उचल घ्यायची आहे, त्यांनी संबंधित विभाग नियंत्रकांकडे अर्ज सादर करावेत. हे अर्ज तपासून पात्र कर्मचाऱ्यांची यादी १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत मुख्यालयाला पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, एसटी महामंडळाने प्रलंबित मागण्यांसाठी येत्या १३ ऑक्टोबरपासून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. अशा वेळी राज्य सरकारच्या निधी मंजुरीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

