(कल्याण / ठाणे )
कल्याणमधील बेपत्ता झालेल्या शिक्षिका संगीता चंदनशिवे यांच्या हत्येचा उलगडा करण्यात कल्याण गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. अनेक वर्षांपासून परिचित असलेल्या मित्राने मालमत्तेच्या (प्रॉपर्टी) वादातून आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने हा खून केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून एका आरोपीचा शोध सुरू आहे. मृत शिक्षिकेच्या ATM कार्डचा वापर करून पैसे काढल्याचा पुरावा, CCTV फुटेज आणि तांत्रिक तपास यांच्या आधारे पोलिसांनी या हत्येचा छडा लावला.
14 जुलैपासून बेपत्ता, चार दिवसांनी मृतदेह सापडला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 जुलै रोजी कल्याण पश्चिमेतील मोरे परिसरात राहणाऱ्या शिक्षिका संगीता चंदनशिवे या नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. त्यानंतर आसनगाव येथे एलआयसीच्या कामानिमित्त जाणार असल्याचे त्यांनी काही नातेवाईकांना सांगितले होते. मात्र, दिवसभरानंतरही त्या घरी परतल्या नाहीत. त्यामुळे चिंताग्रस्त कुटुंबीयांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर कोळसेवाडी पोलीस आणि कल्याण गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. तपास सुरू असतानाच चार दिवसांनी घोटी परिसरातील एका रुग्णालयाजवळ संगीता चंदनशिवे यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे बेपत्ता प्रकरणाला हत्येचे गंभीर वळण मिळाले आणि तपास अधिक वेगाने सुरू करण्यात आला.
ATM कार्डमुळे उघड झाला आरोपींचा माग
तपासादरम्यान पोलिसांना अत्यंत महत्त्वाचा धागा मिळाला. मृत शिक्षिकेच्या ATM कार्डचा वापर करून घोटी परिसरातील ATM मधून पैसे काढण्यात आल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी संबंधित ATM केंद्रातील CCTV फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन आणि CCTV फुटेजच्या आधारे संशयितांची ओळख पटवण्यात आली. या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेत चौकशी केली असता संपूर्ण कट उघडकीस आला.
प्रॉपर्टीवर डोळा; विश्वासात घेऊन घोटीला नेले
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, गोकुळ आव्हाड हा संगीता चंदनशिवे यांचा अनेक वर्षांपासून परिचय होता. दोघांमध्ये दीर्घकाळ मैत्रीचे संबंध होते. मात्र, आरोपीचा संगीता चंदनशिवे यांच्या मालमत्तेवर डोळा होता. त्यासाठी तो सातत्याने त्यांच्यावर दबाव टाकत असल्याचे तपासात समोर आले आहे. संगीता चंदनशिवे यांनी मालमत्तेबाबत कोणताही हक्क देण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने त्यांचा खून करण्याचा कट रचल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
तीन साथीदारांच्या मदतीने गळा आवळून हत्या
पोलिसांच्या माहितीनुसार, गोकुळ आव्हाड याने आपल्या साथीदार तुषार पारखे, विनोद पांडे आणि संतोष जाधव यांच्या मदतीने संगीता चंदनशिवे यांना विश्वासात घेऊन घोटी परिसरात नेले. तेथे त्यांचा गळा आवळून खून करण्यात आला, असा आरोप पोलिसांनी केला आहे. हत्येनंतर आरोपींनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मृत शिक्षिकेचे ATM कार्ड वापरून पैसे काढल्यामुळे त्यांचा संपूर्ण कट उघड झाला.
या प्रकरणात कल्याण गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक केली असून, घोटी पोलिसांनी आणखी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. चौथ्या आरोपीचा शोध सुरू असून त्यासाठी विविध ठिकाणी पथके रवाना करण्यात आली आहेत.
या हत्येमागे केवळ मालमत्तेचा वाद होता की आर्थिक व्यवहार अथवा अन्य कारणेही होती, याचा तपास पोलीस करत आहेत. आरोपींनी हा कट किती दिवसांपूर्वी रचला होता, त्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच हत्या करण्यापूर्वी आणि नंतरच्या हालचालींचा तपशील पोलिसांकडून तपासला जात आहे.
संगीता चंदनशिवे हत्याकांडामुळे कल्याण परिसरात मोठी खळबळ उडाली असून, परिचित व्यक्तीनेच मालमत्तेच्या हव्यासापोटी खून केल्याचा आरोप समोर आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

