(पुणे /मावळ)
मावळ तालुक्यात १ मे रोजी जलदुर्घटनांची मालिका घडत चार जणांचा बुडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. जाधववाडी धरण येथे पोहण्यासाठी उतरलेल्या तिघा मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर पवना नदी येथेही एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला. जाधववाडी धरणातील घटनेत अजय गारुडे, संतोष एडके आणि अनिकेत पवार या तिघांचा मृत्यू झाला. हे तिन्ही मित्र फिरण्यासाठी धरण परिसरात आले होते. काही वेळ फिरल्यानंतर त्यांनी पोहण्यासाठी पाण्यात प्रवेश केला. मात्र पाण्याची खोली आणि तळाचा अंदाज न आल्याने ते अचानक खोल भागात गेले आणि जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा करू लागले. पाहता पाहता तिघेही पाण्यात बुडाले.
घटनेची माहिती मिळताच वन्यजीव रक्षक मावळ संस्था, शिवदुर्ग मित्र लोणावळा, NDRF आणि तळेगाव दाभाडे अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मोठ्या प्रयत्नांनंतर तिघांना पाण्याबाहेर काढण्यात आले. त्यानंतर विरा ॲम्बुलन्सच्या मदतीने त्यांना तळेगाव दाभाडे येथील रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून तिघांनाही मृत घोषित केले.
पवना नदीतही तरुणाचा बळी
याच दिवशी पवना नदी परिसरातही एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यामुळे एका दिवसात चार जणांचा मृत्यू झाल्याने मावळ तालुक्यावर दु:खाचे सावट पसरले आहे.
धरण, नदी किंवा तलावात पोहण्यासाठी उतरताना पाण्याची खोली, प्रवाह आणि तळाचा अंदाज न आल्याने अशा दुर्घटना घडतात, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. प्रशासनाने पर्यटकांना आणि स्थानिकांना अशा ठिकाणी पोहताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
या प्रकरणी तळेगाव दाभाडे एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

