(मुंबई)
देशातील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तस्करीचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खजुराच्या बिया काढून खजुराच्या पॅकेटमधून तब्बल २ किलो १७८ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे ₹२१.७८ कोटी रुपये इतकी आहे. ही कारवाई महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) केली असून, सिएरा लिओनवरून आलेल्या प्रवाशासह कोकेनची डिलिव्हरी घ्यायला आलेल्या आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
तपासात समोर आले आहे की, तस्करांनी खजुराच्या बिया काढून त्यांच्या जागी कोकेन भरले आणि ते खजूर पुन्हा पॅकेटमध्ये भरून तस्करीचा प्रयत्न केला. मात्र, विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्यांनी संशय आल्याने पॅकेट उघडले असता हा प्रकार उघड झाला.
जप्त करण्यात आलेली पावडर कोकेन असल्याचे प्रयोगशाळा तपासात स्पष्ट झाले आहे. त्यानंतर दोन्ही आरोपींवर एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पोलिस आता या कोकेनचा पुरवठा मार्ग, नेटवर्क आणि भारतातील संपर्क याबाबत सखोल चौकशी करत आहेत. या कारवाईमुळे मुंबई विमानतळावरील सुरक्षा यंत्रणा आणि डीआरआयला मोठे यश मिळाले असून, या प्रकाराने तस्करांच्या नव्या डावपेचांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

