(मालवण)
महाराष्ट्राच्या समुद्रात घुसखोरी करून अवैध मासेमारी करत मत्स्य लूट करणाऱ्या कर्नाटक मलपी येथील हायस्पीड नौका ‘संनिधी १’वर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने धडक कारवाई केली. ही कारवाई सिंधुदुर्ग निवती येथील समुद्रात करण्यात आली. मत्स्य विभागाकडून पुढील दंडात्मक कारवाईसाठी नौका सर्जेकोट बंदरात आणण्यात आली. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय सिंधुदुर्ग सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिनाभरात परराज्यातील नौकांवर केलेली ही चौथी कारवाई आहे. परराज्यातील नौकांची महाराष्ट्र सागरी जलधी क्षेत्रात होणारी घुसखोरी, मासळीची होणारी लूट, स्थानिक मच्छीमारांचे होणारे नुकसान थांबले पाहिजे. याबाबत सातत्याने आवाज उठवून आक्रमक भूमिका मांडणारे आमदार निलेश राणे, मत्स्यविकास मंत्री नितेश राणे यांच्या निर्देशामुळे ही कारवाई करण्यात येत आहे.
मत्स्यव्यवसायचे सहाय्यक आयुक्त सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली मत्स्य विभागाच्या शीतल नौकेतून सागरी गस्त सुरू होती. या दरम्यान परवाना अधिकारी मुरारी भालेकर, सहकारी सागरी सुरक्षा पर्यवेक्षक, रक्षक दीपेश मायबा, मिमोह जाधव, स्वप्नील सावजी, चंद्रकांत ऊर्फ भाऊ कुबल, दिवाकर जुवाटकर, शुभम राऊळ, पोलीस कॉन्स्टेबल गुरुनाथ परब यांनी कर्नाटक मलपी येथील नौका श्री संनिधी १ क्रमांक आयएनडीके. ए ०२ एमएम ४५९४ ही महाराष्ट्र राज्याच्या जलधी क्षेत्रात निवतीसमोर १० सागरी नॉटिकल मैल क्षेत्रात अवैध मासेमारी करताना पकडण्यात आली. पकडलेल्या हायस्पीड नौकेच्या संबंधित नौकामालकाविरुद्ध महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमन १९८१ अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.
मत्स्य विभागाकडून सातत्याने अवैध हायस्पीड नौकावर सुरू असलेल्या कारवाईबाबत मच्छीमार बांधवांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.