(संगमेश्वर / संदेश जिमन)
संगमेश्वर तालुक्यातील अंत्रवली गावाचे सुपुत्र ऋषिकेश राजारामराव सुर्वे यांनी आपल्या कष्ट, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर मुंबई विद्यापीठाकडून रसायनशास्त्र विषयात पी.एच.डी. पदवी संपादन केली आहे. या यशाची माहिती मिळताच अंत्रवलीसह संपूर्ण संगमेश्वर तालुक्यात अभिमान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ऋषिकेश यांनी आपल्या शैक्षणिक प्रवासात अनेक आव्हानांचा सामना करत, ज्ञानसाधनेत सातत्य आणि निष्ठा ठेवली. त्यांच्या संशोधन कार्याला विद्यापीठाकडून उच्च दर्जाची दाद मिळाली आहे. या यशाबद्दल बोलताना त्यांनी नम्रपणे सांगितले की, “या यशामागे माझ्या गुरुजनांचे मौलिक मार्गदर्शन, तसेच आई-वडिलांची प्रेरणा आणि पाठबळ हेच माझे खरे बळ आहे. त्यांच्या आशीर्वादामुळे मी हा उच्च शैक्षणिक टप्पा गाठू शकलो.”
अंत्रवलीसारख्या ग्रामीण भागातून उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात पी.एच.डी. सारखे यश संपादन करणे ही अभिमानास्पद बाब ठरली आहे. गावातील नागरिक, शिक्षकवर्ग आणि मित्रपरिवाराकडून ऋषिकेश यांचे उत्स्फूर्त स्वागत आणि अभिनंदन करण्यात आले. अनेकांनी सामाजिक माध्यमांवरही त्यांचे अभिनंदन करत “अंत्रवलीचा गौरव वाढवणारा क्षण” अशी प्रतिक्रिया दिली.
गावातील सर्वांनी ऋषिकेश यांच्या पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. त्यांच्या या यशामुळे अंत्रवली गावाने शिक्षण क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला आहे. गावातील तरुणांनी ऋषिकेशकडून प्रेरणा घेऊन शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती साधावी, अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली.

