(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यात खासगी सावकारीचा अक्षरशः आगडोंब उसळल्याची जोरदार तसेच संतप्त चर्चेला उधाण आले आहे. तालुक्यातील अनेक कुटुंबे खासगी सावकारांच्या गळाला लागून देशोधडीला लागत असल्याची चर्चा ठिकठिकाणी दबक्या आवाजात सुरू आहे. मात्र, सावकारांच्या व त्यांनी पोसलेल्या पोर्ट एजन्टाची तेवढीच दहशत असल्याने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करण्यास कोणी पुढे येत नसल्याचे चित्र आहे.
सावकाराला शासनाने ठरवून दिलेल्या दरानेच कर्ज द्यावे लागते. मात्र, शासनाने ठरवून दिलेला नियम धाब्यावर बसवून थेट व्याज दर आकारला जात आहे. नोंदणीकृत सावकारांवर सहाय्यक निबंधकांची नजर राहते. मात्र, नोंदणी न करता कर्ज दिले जात असेल तर, त्याला अवैध सावकारी संबोधले जाते. या प्रकरणात कर्ज देणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र,भीती पोटी अवैध सावकराविरुद्ध तक्रार देण्यास पुढे कोणी येत नसल्याने तालुक्यात अशा सावकारांवर पोलिसांकडून कारवाईचा बडगा उचलला जात नाही.
काहीच दिवसांपूर्वीच संगमेश्वर शहरासह आजूबाजूच्या गावांत परप्रांतीय सावाकारांचा आगडोंब उसळल्याची बातमी प्रसारमध्यमामध्ये आल्यानंतर आता आपले काही खरे नाही एवढे वर्ष अवैध करत असलेल्या धंद्याचे बिंग फुटले या भीतीने त्यांचा थरकाप उडाला होता. रोज नित्यनियमाने फिरणारे वसुलीधारक दिसेनासे झाले होते. मात्र पुन्हा त्या वसुलीधारक टोळ्या संगमेश्वर शहरासह अन्य गावांत वावरताना दिसू लागल्या आहेत.
ओळखीवर कर्ज देण्यासाठी तसेच दिलेले कर्ज व्याजासह वसूल करण्यासाठी सावकारांनी आपापल्या टोळ्या तयार केल्याचेही चर्चेतून सांगितले जात आहे. या टोळ्या वसुलीसाठी एकमेकांना मदत करताना दिसतात. या संघटित शक्तीच्या जोरावर तालुक्यात वावरणारे सावकार व त्यांना मदत करणारे पोर्ट एजन्ट दिवसेंदिवस मुजोर बनताना दिसत आहेत. याला वेळीच आळा घालणे गरजेचे असून संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपअधीक्षक शिवप्रसाद पारवे हे या अवैध सावकारी धंद्याना चाप लावणार का? अशी तालुकावासियांकडून चर्चा सुरु आहे.