(मुंबई)
कोचीच्या धर्तीवर आता मुंबईतही ‘वॉटर मेट्रो’ सेवा सुरू करण्याच्या दिशेनं राज्य सरकारनं मोठं पाऊल टाकलं आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी कोची मेट्रो रेल लिमिटेड या अनुभवी संस्थेची निवड करण्यात आली असून, डिसेंबरअखेरपर्यंत सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र सागरी महामंडळ (MSMC) या प्रकल्पाची अंमलबजावणी करणार आहे. स्थानिक प्रशासन, पोर्ट ट्रस्ट आणि पर्यावरण विभागाशी समन्वय साधून काम जलदगतीने सुरू आहे.
पहिल्या टप्प्यात 8 जलवाहतूक मार्ग
पहिल्या टप्प्यात मुंबईत 8 प्रमुख मार्गांवर वॉटर मेट्रो सेवा सुरू केली जाणार आहे. त्यापैकी नरीमन पॉइंट–वांद्रे आणि वांद्रे–वर्सोवा हे दोन मार्ग निश्चित झाले आहेत. उर्वरित सहा मार्गांचा अभ्यास सुरू असून, त्यात मीरा-भाईंदर, वसई, गेटवे ऑफ इंडिया, मांडवा, ऐरोली, बेलापूर आणि कल्याण या ठिकाणांचा समावेश होण्याची शक्यता आहे.
पर्यावरणपूरक आणि जलद प्रवासाचा नवा पर्याय
या प्रकल्पाअंतर्गत जागा अधिग्रहण, परवानग्या, टर्मिनल्सचे नियोजन आणि बोटींची निर्मिती यासारख्या टप्प्यांवर काम सुरू आहे. सेवा सुरू झाल्यानंतर मुंबईकरांना एक पर्यावरणपूरक, जलद आणि आधुनिक प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
वाहतूककोंडी आणि लोकलमधील गर्दीपासून दिलासा देतानाच, ही सेवा पर्यटनाला नवा आयाम देईल, असा विश्वास महाराष्ट्र सागरी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. वास करताना खिडकीतून दिसणारा समुद्राचा नजारा हा लोकल किंवा बसपेक्षा वेगळाच अनुभव देईल. प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर आधुनिक टर्मिनल्स उभारले जाणार असून, ते मेट्रो स्थानकांप्रमाणे स्वच्छ, वातानुकूलित व सुरक्षित असतील.
संभाव्य मार्ग :
नारंगी – खारवाडेश्वर
वसई – मीरा-भाईंदर
फाऊंटन जेट्टी – गायमुख – नारंगी
कोलशेत – काल्हेर – मुंब्रा – कल्याण
कल्याण – मुंब्रा – मुलुंड – ऐरोली
वाशी – भाऊचा धक्का
मीरा-भाईंदर – वसई – बोरिवली
नरीमन पॉइंट – मांडवा
बेलापूर – गेटवे – मांडवा
बोरिवली – गोराई – नरीमन पॉइंट
आधुनिक सुविधा आणि ‘मुंबई वन’ कॉमन कार्ड
मुंबई वॉटर मेट्रोमध्ये हायब्रिड इलेक्ट्रिक बोट्स, वातानुकूलित टर्मिनल्स, क्यूआर कोड तिकिट बुकिंग, आणि मोबाइल अॅप यांसारख्या अत्याधुनिक सुविधा असतील. याशिवाय, प्रवाशांना ‘मुंबई वन’ कॉमन कार्ड प्रणाली मिळणार आहे, ज्याद्वारे लोकल, मेट्रो, बस आणि वॉटर मेट्रो या सर्व सेवांचा वापर एकाच कार्डने करता येईल.

