(संगमेश्वर / एजाज पटेल)
हॉटेल, रेस्टॉरंट आणि फूड स्टॉलवर खाद्यान्न बनविण्यासाठी येणाऱ्या खाद्यतेलाचा वारंवार उपयोग करण्यात येत असल्याचे नेहमीच दिसून येते. वारंवार तेल गरम करून तयार करण्यात येणारे खाद्य पदार्थ आरोग्यास अपायकारक आहेत. भारतीय अन्न सुरक्षा प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी यावर निर्बंधही आणले आहेत. प्राधिकरणाच्या आदेशानुसार आता दररोज ५० लिटर खाद्यतेलाचा उपयोग करणाऱ्या हॉटेल्सला तेलाची खरेदी, उपयोग आणि तेल कितीदा गरम केले, याचा रेकॉर्ड ठेवावा लागणार आहे. याशिवाय तेलामध्ये पोलर कम्पाऊंड २५ डिग्रीपेक्षा जास्त असेल तर त्या हॉटेलवर दंडात्मक कारवाई, शिवाय परवाना रद्द करण्याचा अधिकार अन्न व औषध प्रशासन विभागाला आहे. तसेच विभागातर्फे हॉटेल्सची आकस्मिक तपासणी करून डिजिटल यंत्राद्वारे तेलातील पोलर कम्पाऊंडची मात्रा किती आहे, हे तपासण्याचे आदेशही आहेत.
हॉटेलात खाद्यपदार्थ तळण्यासाठी खाद्यतेल वारंवार वापरले जाते. परंतु, खाद्यतेल 25 पोलर युनिटवर वापरू नये, अशा सूचना प्रशासनाच्या असतानाही काही हॉटेलचालकांकडून अनेकदा तेल काळ्या रंगाचे होईपर्यंत वापरले जाते. या तेलातून तळलेले पदार्थ खाल्ल्यास ग्राहकांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागू शकते. खाद्यपदार्थ तळण्यासाठी वारंवार तेच तेल वापरले जात असेल, तर अशा हॉटेलचालकांवर अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे कारवाई करण्याचे अधिकार आहेत. मात्र सबंधित विभाग या बाबींकडे म्हणावे तेवढे लक्ष देत नसल्याने जागरूक जनतेतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
हॉटेलचालकांनो, स्वतःच्या फायद्यासाठी वारंवार तेच तेल वापरू नका, अन्यथा आपण ग्राहकांना कर्करोगाच्या टाकण्याचा धोका आहे. व्यवसायासाठी नाहक ग्राहकांच्या जीवाशी खेळ खेळण्याचा प्रकार करू नका अन्यथा आपल्याला प्रशासनाच्या कडक कारवाईचा सामना करावा लागेल. तेलाचा पुनर्वापर आरोग्याला घातक ठरतो. समोसा, कचोरी व तेलात तळले जाणारे इतर पदार्थासाठी वारंवार त्याच तेलाचा वापर होऊ नये. तेल 25 पोलर युनिटपर्यंतच वापरण्याची परवानगी शासनाने दिली आहे.
हॉटेल व खाद्य दुकानचालकांनी वारंवार तेच तेल वापरू नये. ज्या हॉटेलात 50 लिटरपेक्षा अधिक तेलाची गरज पडते, अशा हॉटेलातील खाद्यपदार्थाची तपासणी आधी करण्यात येते. त्यामुळे नियम तोडल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.
फुटपाथवरील खाद्य खाण्यापासून दूर रहा…
फुटपाथवरील गाड्यांवर वापरलेले खाद्यतेल अनेकदा वापरले जाते. काळ्याकुट्ट तेलातून पुन्हा तळलेले पदार्थ सेवन केल्यास कर्करोग होऊ शकतो. फुटपाथवरील हॉटेलात खाद्यपदार्थाची पाहिजे तेवढी काळजी घेतली जात नाही. अनेकदा पदार्थावर माश्या बसतात. शिळे पदार्थही तळून विक्रीला ठेवलेले असतात. रस्त्यांवरून धावणाऱ्या वाहनांची धूळ त्या पदार्थावर बसत असते. तळलेले पदार्थ सेवन केल्यास अनेक आजारांना सामोरे जावे लागते, अशावेळी ग्राहकानीही जागरूक असणे गरजेचे आहे.
खाद्यतेलात तयार होतात पोलर कम्पाऊंड
खाद्यतेल तीनपेक्षा जास्त वेळ गरम केले तर त्यात पोलिमरायझेनची प्रक्रिया होण्यास सुरुवात होते. त्यानंतर त्यात ट्रान्सफॅट तयार होतात. ट्रान्सफॅटी अॅसिड शरीरासाठी घातक आहेत. यावर प्रतिबंध म्हणून प्राधिकरणाने आदेश दिले असून काटेकोर अंमलबजावणी झाल्यास नागपूरकरांच्या आरोग्यासाठी हितकारक ठरणार आहे. पोलर कम्पाऊंडची डिजिटल यंत्राद्वारे तपासणी तळलेल्या तेलात २५ डिग्रीपेक्षा जास्त आढळलेले पोलर कम्पाऊंड आरोग्यासाठी घातक आहे.