( मुंबई )
आजारी असल्याचे कारण सांगून वैद्यकीय रजेवर गेलेल्या नाशिकच्या मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त प्र. दा. जगताप यांनी प्रत्यक्षात विदेश प्रवास केल्याचे उघडकीस आले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करून त्यांनी परदेशात मौजमजा केल्याच्या गंभीर प्रकाराची दखल घेत मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी त्यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई केली आहे.
देशात युद्धजन्य परिस्थिती असताना विभागातील सर्व अधिकाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर शासकीय कामासाठी इगतपुरी न्यायालयात गेलेल्या सहाय्यक आयुक्त जगताप यांनी शारीरिक अस्वस्थतेचे कारण देत अर्ध्या दिवसाची किरकोळ रजा नाशिक प्रादेशिक कार्यालयात सादर केली. त्यांनी शुगर लेव्हल कमी झाल्यामुळे चक्कर आल्याचे सांगत दवाखान्यात दाखल झाल्याचे भासवले. मात्र, प्रत्यक्षात ते विदेशात प्रवास करत असल्याचे उघड झाले.
या प्रकारामुळे प्र. दा. जगताप यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश न पाळणे, कर्तव्यात कसूर करणे, शासकीय सेवेत गैरहजर राहणे आणि वरिष्ठांची दिशाभूल करणे, असे गंभीर उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी यापूर्वीच विभागातील शिस्तभंग करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा दिला होता. त्यानुसारच त्यांनी कारवाई करत जगताप यांचे तात्काळ निलंबनाचे आदेश दिले.
निलंबन आदेशातील अटी:
-
निलंबन कालावधीत प्र. दा. जगताप यांनी नागपूर प्रादेशिक उपायुक्त, मत्स्य व्यवसाय यांची लेखी परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये.
-
मुख्यालय चंद्रपूर असेल, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
या कारवाईमुळे संपूर्ण मत्स्य व्यवसाय विभागात खळबळ उडाली असून, कर्तव्य कसूर केल्यास कठोर कारवाई टळणार नाही, असा स्पष्ट संदेश या प्रकरणातून विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळाल्याचे बोलले जात आहे.