(मुंबई)
मुंबई व उपनगरासह सागरी किनाऱ्यावर गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. समुद्राला उधाण आलेल्या स्थितीत आज रायगड जिल्ह्यातील उरण येथे मासेमारीची बोट बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. ही बोट गुजरातमधील असल्याचे समोर आले आहे. दुर्घटनेचे व्हिडिओदेखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सर्व सात खलाशी सुरक्षित
बुडालेल्या या बोटीत एकूण सात खलाशी होते. नौदलाच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने युद्धपातळीवर बचावकार्य राबवून सर्वांना सुखरूप वाचवण्यात यश आले. बोटीचा शोध मात्र अद्याप सुरू असून ती समुद्रात बुडाल्याचे स्पष्ट झाले आहे.
उधाण असतानाही मच्छीमार समुद्रात
दरम्यान, मुसळधार पावसामुळे आणि समुद्र खवळलेला असल्याने अशा दिवसांत मासेमारीस बंदी असते. तरीदेखील काही मच्छीमार धोका पत्करून समुद्रात उतरत असल्याने अशा दुर्घटना घडत असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी अलिबागमध्ये अशाच प्रकारची घटना घडली होती. त्यात तीन मच्छीमारांचा मृत्यू झाला तर सहा जणांना वाचवण्यात आले होते.
उरण दुर्घटनेच्या व्हिडिओमध्ये बोट जोरदार लाटांमध्ये हेलकावे खाताना दिसते. दरम्यान, बचाव पथकातील जवान आणि मच्छीमार लाईफ जॅकेटच्या मदतीने खलाशांना सुरक्षित बाहेर काढताना स्पष्ट दिसत आहेत.
समुद्राचे पाणी शिरल्याने बोट बुडाली
प्राथमिक माहितीनुसार, बोटीमध्ये समुद्राचे पाणी शिरल्याने ती पूर्णपणे बुडाली. मात्र, सुदैवाने वेळेत मदत मिळाल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.

