(पनवेल)
रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात उभारण्यात आलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन ८ ऑक्टोबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी २.४० वाजता प्रधानमंत्री प्रकल्पस्थळी दाखल होऊन टर्मिनल इमारतीची पाहणी करतील आणि त्यानंतर उद्घाटन सोहळ्यानंतर जाहीर सभेत जनतेशी संवाद साधतील. जवळपास दोन तासांचा हा कार्यक्रम असणार आहे.
विमानतळाचं औपचारिक उद्घाटन ऑक्टोबर महिन्यात होणार असलं तरी प्रत्यक्ष विमान वाहतूक डिसेंबरपासून सुरू होणार आहे. उद्घाटनानंतर विमानतळ सुरक्षा दल (CISF) ताब्यात घेईल आणि सुरक्षा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच उड्डाण सेवा सुरू होईल, अशी माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे महामुंबईसाठीचे दुसरे विमानतळ असून, सध्या अस्तित्वात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापेक्षा जवळपास दुप्पट क्षमतेचं आहे. हे ग्रीनफिल्ड प्रकल्प असून एकूण १,१६० हेक्टर क्षेत्रावर उभारण्यात आलं आहे. संपूर्ण प्रकल्पात चार टर्मिनल इमारती असून पहिल्या टर्मिनलचं काम पूर्ण झालं आहे.
सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) पद्धतीवर या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली असून सिडकोचा २६ टक्के आणि NMIAL (Navi Mumbai International Airport Limited) चा ७४ टक्के हिस्सा आहे. पहिल्या टप्प्यात दरवर्षी २० दशलक्ष प्रवासी हाताळण्याची क्षमता असून, अंतिम टप्प्यात ही क्षमता ९० दशलक्ष प्रवासी आणि ३.५ दशलक्ष टन मालवाहतूक इतकी वाढवली जाणार आहे.
पहिल्या टप्प्यासाठी तब्बल १९,६४६ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. विमानतळाची धावपट्टी कोणत्याही मोठ्या आकाराच्या विमानांच्या उड्डाणासाठी सक्षम आहे. विमानतळाचं सर्वात वैशिष्ट्यपूर्ण तंत्र म्हणजे ‘ऑटोमेटेड पीपल मूव्हर’ (APM) प्रणाली — सर्व टर्मिनल्स परस्परांना भूमिगत बोगद्यांद्वारे जोडले गेले आहेत. त्यामुळे प्रवासी कोणत्याही टर्मिनलवर चेक-इन करून थेट आपल्या उड्डाणाच्या टर्मिनलकडे सहज पोहोचू शकतात.
विमानतळाला रस्ता, रेल्वे आणि जलवाहतूक या सर्व माध्यमांनी जोडण्यात आलं आहे. तरघर येथे वॉटर टॅक्सी सुविधा उपलब्ध असेल, तसेच अटल सेतू मार्गे मुंबईशी थेट संपर्क साधला जाणार आहे. शिवाय, मुंबई–नवी मुंबई जोडणारी ‘गोल्ड लाईन मेट्रो’ देखील प्रस्तावित आहे, अशी माहिती सिंघल यांनी दिली.
या विमानतळामुळे विमान वाहतूक, लॉजिस्टिक्स, आयटी, हॉस्पिटॅलिटी आणि रिअल इस्टेटसारख्या विविध क्षेत्रांमध्ये दोन लाखांहून अधिक रोजगार निर्माण होणार आहे. नवी मुंबई विमानतळ हे लंडन, न्यूयॉर्क आणि टोकियोसारख्या जागतिक दर्जाच्या जुळ्या विमानतळांना टक्कर देणारं भारतातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं विमानतळ ठरणार आहे.

