(खोपोली / रायगड)
रायगड जिल्ह्यातील खोपोली शहरातील ऐतिहासिक आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पेशवेकालीन वीरेश्वर मंदिरातील चोरीप्रकरणाचा अवघ्या 48 तासांत उलगडा करण्यात खोपोली पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) मोठे यश मिळवले आहे. भगवान शंकराच्या पिंडीवरील सुमारे 17 किलो वजनाचे चांदीचे आच्छादन चोरी करणाऱ्या चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. या धडाकेबाज कारवाईबद्दल रायगड पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अमोल सुरेश कसबे, विलास साहेबराव आगीवले (रा. शिरूर, जि. पुणे), दिलीप राजू जाधव आणि सखाराम छबन गायकवाड (रा. पारनेर, जि. अहिल्यानगर) अशी आहेत.
पहाटेच्या सुमारास मंदिरात घुसून केली चोरी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार (19 जुलै) रोजी पहाटे अडीचच्या सुमारास आरोपींनी खोपोलीतील ऐतिहासिक वीरेश्वर मंदिरात प्रवेश केला. मंदिरातील भगवान शंकराच्या पिंडीवरील सुमारे 17 किलो वजनाचे चांदीचे आच्छादन त्यांनी चोरी करून पसार झाले. ही संपूर्ण घटना मंदिरातील आतील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली होती. मात्र, मंदिराच्या बाहेरील CCTV कॅमेरा बंद असल्यामुळे आरोपी कोणत्या दिशेने पसार झाले, याचा माग काढणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरले.
पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी घेतला आढावा
घटनेची माहिती मिळताच रायगडचे पोलीस अधीक्षक अचल दलाल यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल पाटील आणि पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात तपास मोहीम हाती घेण्यात आली. तपासासाठी खोपोली पोलिसांची तीन, खालापूरची एक, रसायनीची एक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची (LCB) विशेष पथके अशा एकूण आठ तपास पथकांची स्थापना करण्यात आली.
CCTV आणि Fastagमुळे आरोपींपर्यंत पोहोचले पोलीस
या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी आरोपींनी वापरलेल्या संभाव्य मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. परिसरातील विविध CCTV फुटेज, तांत्रिक माहिती आणि Fastagच्या नोंदींचे विश्लेषण करण्यात आले. या तपासातून आरोपींचे वाहन कर्जतच्या दिशेने गेल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासाचा वेग वाढवत पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर येथे सापळा रचला आणि चारही आरोपींना अटक करण्यात यश मिळवले.
आरोपींकडून भगवान शंकराच्या पिंडीवरील चोरीस गेलेले सुमारे 17 किलो वजनाचे चांदीचे आच्छादन जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे चोरीस गेलेला महत्त्वाचा मुद्देमाल सुरक्षितपणे हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
आणखी आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता
प्राथमिक तपासात चार आरोपींना अटक झाली असली तरी या चोरीमागे आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. आरोपींनी यापूर्वी अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत का, त्यांचे इतर गुन्हेगारी रेकॉर्ड आहेत का आणि चोरीमागे कोणते मोठे रॅकेट कार्यरत आहे का, याचा तपास सुरू आहे.
दरम्यान, अवघ्या 48 तासांत चोरीचा उलगडा करून आरोपींना अटक करत चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त केल्यामुळे रायगड पोलिसांच्या तत्पर आणि तांत्रिक तपासाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

