(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील एसटी प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. एसटी महामंडळाच्या ‘एनसीएमसी’ (National Common Mobility Card) स्मार्ट कार्डसाठी संगमेश्वर बस स्थानकात स्वतंत्र नोंदणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना कार्ड काढण्यासाठी देवरुखपर्यंत हेलपाटे मारावे लागणार नाहीत.
संगमेश्वर बस स्थानकात स्वतंत्र एनसीएमसी स्मार्ट कार्ड केंद्र सुरू करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे संगमेश्वर तालुका उपाध्यक्ष मिथुन निकम यांनी केली होती. या संदर्भातील “रत्नागिरी 24 न्यूज”मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर रत्नागिरी विभागाचे विभाग नियंत्रक अश्वजीत जाणराव यांनी तत्काळ दखल घेत आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली. त्यांच्या पुढाकारामुळे बुधवारपासून संगमेश्वर बस स्थानकातच स्मार्ट कार्ड नोंदणी व वितरणाची सुविधा प्रत्यक्ष सुरू झाली आहे.
पदभार स्वीकारल्यापासून विभाग नियंत्रक अश्वजीत जाणराव यांनी प्रवाशांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यावर भर दिला आहे. प्रशासनात गतिमानता, प्रवाशांशी थेट संवाद आणि तातडीने निर्णय घेण्याची त्यांची कार्यपद्धती पुन्हा एकदा या निर्णयातून दिसून आली. संगमेश्वर तालुक्यातील प्रवाशांची अडचण लक्षात घेऊन त्यांनी देवरुख केंद्रावरील वाढता ताण कमी करण्यासाठी संगमेश्वर येथे स्वतंत्र केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला.
भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण आणि डोंगराळ असलेल्या संगमेश्वर तालुक्यात यापूर्वी देवरुख आगारातच एकमेव एनसीएमसी कार्ड केंद्र कार्यरत होते. त्यामुळे संगमेश्वर व परिसरातील शेकडो गावांतील नागरिकांना केवळ स्मार्ट कार्डसाठी अतिरिक्त प्रवास खर्च करून देवरुखला जावे लागत होते. तेथे मोठ्या रांगा, सर्व्हर डाऊन किंवा तांत्रिक अडचणींमुळे अनेकांना दिवसभर प्रतीक्षा करावी लागत होती. काही वेळा काम न झाल्याने रिकाम्या हाताने परतण्याची वेळ येत होती. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दुर्गम भागातील प्रवाशांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता.
आता संगमेश्वर बस स्थानकातच ही सुविधा उपलब्ध झाल्याने तालुक्यातील पूर्व व उत्तर भागातील शेकडो गावांतील नागरिकांना थेट लाभ मिळणार आहे. देवरुखपर्यंतचा अतिरिक्त प्रवास, वेळ आणि आर्थिक खर्च वाचणार असून कार्ड मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे. स्थानिक पातळीवरच सुविधा उपलब्ध झाल्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक त्रासही कमी होणार आहे. तसेच देवरुख केंद्रावरील गर्दीचा ताण कमी होऊन दोन्ही केंद्रांवरील सेवा अधिक जलद व सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
प्रवाशांची रास्त समस्या प्रभावीपणे मांडल्याबद्दल भाजपा तालुका उपाध्यक्ष मिथुन निकम यांनी डिजिटल माध्यमाचे आभार मानले आहेत. तसेच मागणीची तातडीने दखल घेऊन अल्पावधीतच संगमेश्वर येथे स्मार्ट कार्ड केंद्र सुरू केल्याबद्दल विभाग नियंत्रक अश्वजीत जाणराव तसेच एसटी महामंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे त्यांनी आभार व्यक्त केले.
संगमेश्वर तालुक्यातील ग्रामस्थ, प्रवासी, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांनीही या लोकाभिमुख निर्णयाचे स्वागत करत एसटी प्रशासनाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

