(दापोली)
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना शाखा, दापोली यांच्या वतीने “गुणवंत विद्यार्थी गुणगौरव व शाळा आणि शिक्षक सन्मान सोहळा – २०२५” कार्यक्रम रविवारी (दि. ५ ऑक्टोबर) श्री मंगल कार्यालय, दापोली येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तालुका नेते नितीन अर्जुन बांद्रे यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून प्रवीण काटकर, रमाकांत शिगवण, रामचंद्र सांगडे (गटशिक्षणाधिकारी, पं. स. दापोली), बळीराम राठोड, सुधाकर गायकवाड (शिक्षण विस्तार अधिकारी, पालगड), सुनिल कारखेले (अध्यक्ष, केंद्रप्रमुख संघटना), जिल्हाध्यक्ष विश्वनाथ डवरी, जिल्हा उपाध्यक्ष विश्वास भोपे, जिल्हा महिला प्रतिनिधी विश्रांती शेळके-फडतरे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात दापोली तालुक्यातील विविध शाळांमधील चौथी, पाचवी व आठवी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, नवोदय विद्यालय प्रवेश पात्र विद्यार्थी तसेच RTS परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांना प्रमाणपत्रे आणि सन्मानचिन्हे देऊन गौरविण्यात आले. मार्गदर्शक शिक्षक व शाळांचा देखील विशेष सन्मान करण्यात आला.
शिक्षकांच्या हक्कांसोबतच कर्तव्याची जाणीव ठेवून आधुनिक शिक्षणात आवश्यक असणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानावरील कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेस शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात तालुकाध्यक्ष भालचंद्र घुले यांनी शिक्षणातील गुणवत्ता, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि जुन्या पेन्शन हक्काच्या चळवळीविषयी संघटनेची भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सविता मडीवाळ व श्रीमती गीता पाध्ये यांनी केले, तर आभारप्रदर्शन श्री. स्वप्निल परकाळे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संघटनेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक, पालक व विद्यार्थी यांनी सहकार्य केले.

