(नाशिक)
नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात रविवारी सकाळी उघडकीस आलेल्या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली. फुले माळवाडी शिवारात एकाच कुटुंबातील चार जण मृतावस्थेत सापडल्यामुळे नागरिकांना मोठा धक्का बसला. 40 वर्षीय गोविंद बाळू शेवाळे हे घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले, तर पत्नी आणि दोन लहान मुलांचे मृतदेह पलंगावर झोपलेल्या स्थितीत आढळून आले.
घटनेचा तपशील
फुले माळवाडी येथे राहणारे गोविंद बाळू शेवाळे (40), पत्नी कोमल शेवाळे (35) आणि त्यांच्या दोन मुलांचा म्हणजेच खुशी (8) व शाम (दीड वर्षे) मृत्यू झाल्याची माहिती मिळताच देवळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात पत्नी आणि मुलांचा मृत्यू रात्री झोपेतच झाल्याचं, तर गोविंद यांनी सकाळी आत्महत्या केल्याचं निष्पन्न झाले. पोलिसांनी पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
‘भावपूर्ण श्रद्धांजली’ स्टेटसने उलगडलं सत्य
आत्महत्येपूर्वी गोविंद यांनी रविवारी सकाळी आपल्या मोबाईलवर ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ असं स्टेटस ठेवलं. हे स्टेटस त्यांच्या लहान भावाच्या नजरेस पडताच त्याला संशय आला. लगेचच नातेवाईकांना माहिती देऊन तो घटनास्थळी पोहोचला. घरात प्रवेश करताच पत्नी आणि मुलांचे मृतदेह पलंगावर, तर गोविंद यांनी गळफास घेतल्याचं समोर आलं. या दृश्याने सर्व नातेवाईक व ग्रामस्थ हादरून गेले.
देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक विभागीय फॉरेन्सिक टीमला तपासासाठी पाचारण करण्यात आले. मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आले आहेत. सर्व मृत्यूमागचं नेमकं कारण पोस्टमार्टमनंतरच स्पष्ट होणार आहे. कुटुंबानं असा टोकाचा निर्णय का घेतला, याबाबत अद्याप काहीही निश्चित झालेलं नाही.
जेवणात विषारी पदार्थ?
प्राथमिक माहितीप्रमाणे, शनिवारी उशीरा गोविंद यांनी पत्नी आणि मुलांना जेवणातून विषारी पदार्थ दिल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या तिघांचा रात्री झोपेतच मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. यानंतर गोविंद यांनी सकाळी आत्महत्या केली.
शांत व साधं कुटुंब तरी असा टोकाचा निर्णय कशामुळे?
शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शेवाळे कुटुंब शांत, साधं आणि कोणाशीही वाद नसलेलं म्हणून ओळखलं जात होतं. परंतु गेल्या काही महिन्यांपासून घरातील आर्थिक आणि वैयक्तिक ताणतणाव वाढल्याची चर्चा स्थानिकांमध्ये होती. पोलिसांनी मात्र कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यास नकार देत सर्व शक्यता तपासण्यास सुरुवात केली आहे. मोबाइलमधील संदेश, स्टेटस, घरातील परिस्थिती, तसेच पोस्टमार्टम अहवाल यांच्या आधारे पुढील दिशा निश्चित होणार आहे.

