(पंढरपूर)
आषाढी, कार्तिकी, माघ आणि चैत्री — या चार प्रमुख वाऱ्यांपैकी कार्तिकी एकादशी वारीला विशेष महत्त्व आहे. परंपरेनुसार आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा पार पडते. मात्र, सध्या राज्यात दोन उपमुख्यमंत्री असल्याने या वेळी कोणाच्या हस्ते महापूजा पार पाडायची, हा प्रश्न मंदिर समितीसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे मंदिर समितीने शासनाकडून यासंदर्भात स्पष्ट मार्गदर्शन मागण्याचा निर्णय घेतला आहे.
कार्तिकी एकादशी कधी आहे?
यंदाची कार्तिकी शुद्ध एकादशी रविवार, २ नोव्हेंबर २०२५ रोजी आहे. यात्रेचा कालावधी २२ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर असा निश्चित करण्यात आला आहे. या कालावधीत सुमारे ८ ते १० लाख भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पंढरपूरात दाखल होणार आहेत. आषाढी वारीप्रमाणेच सर्व आवश्यक सोयीसुविधा भाविकांना उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
२६ ऑक्टोबरपासून २४ तास दर्शन व्यवस्था
औसेकर महाराज म्हणाले, “२ नोव्हेंबर रोजी पहाटे २.२० वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री व मानाचे वारकरी यांच्या शुभहस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा होईल. वारकरी व भाविकांना सुरळीत आणि सुलभ दर्शन मिळावे म्हणून २६ ऑक्टोबरपासून २४ तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.” तसेच मंदिराच्या जतन-संवर्धन कामाबाबत विभागीय आयुक्त (पुणे) यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पूर्वतयारी बैठकीत झाले महत्त्वाचे निर्णय
श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्त निवास येथे पार पडलेल्या या बैठकीला सदस्य शकुंतलाताई नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर), ॲड. माधवी निगडे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत, तसेच पुरातत्व विभागाचे डॉ. विलास वाहणे, कार्यकारी अभियंता श्रीनिवास गुजरे, वास्तुविशारद तेजस्विनी आफळे, ठेकेदार आणि सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.
महत्त्वाचे निर्णय:
कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले की, बैठकीत खालील निर्णय घेण्यात आले –
- उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या महापूजेबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागविणे
- २६ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर या कालावधीत २४ तास दर्शन सुरू ठेवणे
- मंदिर व परिवार देवतांच्या जतन-संवर्धनासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करणे
- पंढरपूर विकास आराखड्यात मुखदर्शनरांग, प्रशासकीय कार्यालय, अन्नछत्र आणि इतर सोयींचा समावेश करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठविणे
- कम्युनिटी रेडिओ केंद्रासाठी ४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनास प्रस्ताव सादर करणे
- एमटीडीसी भक्तनिवासाचा करार वाढविण्यासाठी शासनाला विनंती करणे
सदर बैठक कार्तिकी यात्रेच्या नियोजनाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली असून, लवकरच शासनाकडून महापूजेच्या अधिकाराबाबतचा निर्णय जाहीर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

